जन्मजात वाकडे पाय सरळ होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जन्मजात वाकडे पाय सरळ होणार
जन्मजात वाकडे पाय सरळ होणार

जन्मजात वाकडे पाय सरळ होणार

sakal_logo
By

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नुकताच ‘क्लब फूट’ ओपीडी सुरू करण्यात आली. जन्मजात मुलांच्या पायामध्ये असणाऱ्या व्यंगाला क्लब फूट म्हटले जाते. ही पायाशी संबंधित विकृती असून, यात मुलाच्या पायाचा आकार असामान्य असतो. बाळंतपणाच्या वेळी वाकड्या पायाचे दिसणे त्रासदायक ठरू शकते. जन्मजात पायात व्यंग असणाऱ्या मुलांसाठी ही ओपीडी उपयुक्त ठरणार असल्याचे राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकुर यांनी सांगितले.

क्लब फूट समस्येवर बोलताना राजावाडीतील बालरोग ऑर्थोपेडिक डॉ. चिंतन दोशी यांनी सांगितले, की वाकडा पाय घेऊन जन्माला आलेल्या मुलांच्या तपासणीसाठी ही ओपीडी सुरू केली आहे. यात तपासणी करून मुलांचा वाकडा झालेला पाय सरळ केला जातो. बहुतेक प्रकरणांमध्ये ही स्थिती डॉक्टरांच्या मदतीने सुधारली जाऊ शकते. साधारण ८०० ते १००० मुलांमागे एक क्लब फूट असलेले मूल जन्माला येते, असे प्रमाण सांगते.

वाकड्या पायाचे मुल जन्माला आल्यावर आई-वडील घाबरून जातात; मात्र यावर उपचार असून घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉ. दोशींनी स्पष्ट केले. मुल जन्माला आल्यावर पहिल्याच आठवड्यात त्या पायाचे प्लास्टरिंग सुरू केले जाते; मात्र, पाय सरळ होण्याची प्रक्रिया धीमी असते. तसेच काही रुग्णांवर चार ते सहा प्लास्टर करावे लागतात. काही प्रकरणात पालक उशिरा आल्यास सात ते आठ प्लास्टरही करावे लागतात. दुर्मिळ प्रकरणांत १० प्लास्टरमध्ये पाय सरळ होण्याची खात्री तज्ज्ञ देतात.

समस्येचे मूळ
क्लब फूट ही समस्या अनेकदा मूल गर्भाशयात असतानाच उद्भवते. गर्भाशय आकाराने लहान असल्यास गर्भ आपला पाय गर्भातच मोडून ठेवतो. यातून मुलाचा पाय वाकडा होऊ शकतो. तसेच काहींचे पाय अनुवंशिक दोषातून वाकडे होऊ शकतात. यात वडील किंवा आजोबांना तसा त्रास असल्यास मुलालाही तसे होते. कधी कधी मुलाचा पाय वाकडा होण्यास कोणत्याही कारणाची गरज नसल्याचेही सिद्ध झाले असल्याचे डॉ. चिंतन दोशी म्हणाले.

प्रौढ अवस्थेपर्यंत पाय सरळ केला जाऊ शकतो; मात्र कालावधीनुसार प्लास्टरची संख्या तसेच कधी शस्त्रक्रिया तर कधी शॉक उपचार देऊन पाय सरळ केला जातो. काही प्रकरणात कॉन्सेटी प्लास्टर करावे लागते. मुल चालायला लागण्याआधी मुलाचा पाय निव्वळ प्लास्टरने सरळ केला जाऊ शकतो. तर, चार पाच वर्षांचे मूल असल्यास त्याला शॉक उपचार आणि प्लास्टर देऊन सरळ केले जाते. त्याहून प्रौढ असलेल्या रुग्णावर बोनी सर्जरी करून त्यावर प्लास्टर केले जाते.
- डॉ. चिंतन दोशी, सल्लागार, बालरोग ऑर्थोपेडिक

राजावाडीच्या ऑर्थोपेडिक विभागात चांगले तज्ज्ञ उपलब्ध असून अस्थिरोग पीडियॅट्रिक तज्ज्ञांची टीम या ठिकाणी आहे. साधारण ८०० ते १००० मुलांमध्ये एक क्लब फूट मूल जन्माला येते. ते उपचारांनी सामान्य होते. ओपीडी सुरू करण्यात आल्याने अशा मुलांना मदत होणार आहे.
- डॉ. भारती राजुलवाला, उपवैद्यकीय अधीक्षक, राजावाडी रुग्णालय