खाद्यपदार्थ क्षेत्रात मॅरिको विस्तारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्यपदार्थ क्षेत्रात मॅरिको विस्तारणार
खाद्यपदार्थ क्षेत्रात मॅरिको विस्तारणार

खाद्यपदार्थ क्षेत्रात मॅरिको विस्तारणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ ः तीस वर्षे एफएमसीजी क्षेत्रात नाव कमावलेल्या मॅरिकोला आता खाद्यपदार्थ क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी करायची आहे. त्या स्पर्धेत विजयी होण्यासाठी ग्राहकांचे मत विचारात घेऊन, संशोधन करून नव्या पद्धतीचे आरोग्यदायी खाद्यपदार्थ देत आहोत, असे मॅरिकोचे सीओओ व सीईओ संजय मिश्रा यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

पॅराशूट, सफोला हे लोकप्रिय ब्रँड देणाऱ्या मॅरिकोने गेल्या काही वर्षांमध्ये आणलेल्या चटपटीत ओट्स, सोया सफोला चंक, ओट्स अूडल्स, मध, पीनट बटर यांना खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्या बळावरच येत्या दोन वर्षांत आमची उलाढाल एक हजार कोटींवर जाईल, असे कंपनीचे एम. डी. स्वागतो गुप्ता यांनी सांगितल्याचा दाखलाही मिश्रा यांनी दिला.

नवे खाद्यपदार्थ बाजारात आणण्यापूर्वी आम्ही ग्राहकांचे मत विचारात घेतो, ग्राहकांना नाश्त्याला गोड ऐवजी चमचमीत पदार्थ आवडतात हे कळल्याने आम्ही चमचमीत चवीचे ओट्स आणले. आता त्यांचा खप साध्या ओट्सपेक्षाही जास्त झाला आहे. भारतात प्रोटीन कुपोषणाची समस्या मोठी आहे, त्यासाठी पूर्वोत्तर राज्यांमधील लोक सोयावर भर देतात. मात्र ते रबरासारखे चिवट असल्याने इतर भागातील लोकांनी नापसंत केल्याचे आढळले. त्यामुळे आम्ही जगातील पहिलेवहिले मऊ सोया खाद्यान्न, सोया सफोला चंक बाजारात आणले. अजूनही यात आमचे संशोधन सुरू असून महिन्याभरातच नवा सोया खाद्यपदार्थ बाजारात आणू, असेही ते म्हणाले.

आम्ही नूडल्सला पर्याय म्हणून वेगळ्या आकाराचे ‘ऊडल्स’ बाजारात आणले, मैदा हानिकारक म्हणून त्याऐवजी ओट्सचे हे ‘ऊडल्स’ केले. आमचा मध हा भारतातील सर्वोत्तम आहे. आम्ही नव्या कल्पना वापरून स्पर्धेत यशस्वी ठरू, असेही त्यांनी सांगितले.

तेलाच्या किमती घसरतील
.................................
रशिया युक्रेन युद्धामुळे बंद झालेला सूर्यफूल तेलाचा पुरवठा आता सुरू झाला असल्याने लिटरमागे पन्नास रुपयांनी खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. यापुढेही असाच कल राहील, अशी खात्रीही मिश्रा यांनी व्यक्त केली.