आगरी कोळ्याचे जागृत देवस्थान ‘धारावी मंदिर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगरी कोळ्याचे जागृत देवस्थान ‘धारावी मंदिर’
आगरी कोळ्याचे जागृत देवस्थान ‘धारावी मंदिर’

आगरी कोळ्याचे जागृत देवस्थान ‘धारावी मंदिर’

sakal_logo
By

प्रकाश लिमये : भाईंदर
भाईंदर उत्तन रस्त्यावरील धारावी येथे धारावी देवीचे मंदिर हे आगरी कोळी समाजाचे श्रद्धास्थान आहे. मनोकामना पूर्ण करणारी अतिशय जागृत, अशी या धारावी देवीची ओळख आहे. अतिशय निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या कुशीत वसलेल्या या मंदिराला पेशवेकालीन इतिहासाची पार्श्वभूमी आहे. नरवीर चिमाजी अप्पा वसईच्या किल्ल्यावर स्वारी करण्यासाठी आले असताना त्यांनी धारावी देवीचे दर्शन घेतले होते, अशी आख्यायिका आहे. इंग्रजांच्या राजवटीत तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट आर्ट यांनी मंदिरातील दिवाबत्तीसाठी प्रतिवर्षी १५ रुपये मंजूर केले होते.
सध्या देवळात नवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहाने सुरू आहे. आगरी कोळ्याची देवी अशी धारावी देवीची ओळख असली, तर पंचक्रोशीतील सर्व जातीधर्माचे भक्त देवीच्या दर्शनाला या काळात आवर्जून येत असतात. या संपूर्ण मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. पहाटेच्या काकड आरतीसह दिवसांतून तीन वेळा देवीची आरती केली जात आहे. दररोज रात्री स्थानिक भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रमदेखील होत असतो. अष्टमीला देवीचा होम केला जातो आणि दसऱ्याला देवीला अभिषेक करून नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते. नवरात्रात देवीची ओटी भरण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्रासोबतच मंदिरात महाशिवरात्र उत्सवदेखील तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. निसर्गाच्या कुशीत वसलेले धारावी मंदिर एक पर्यटन क्षेत्र म्हणूनही उदयास येत असून अतिशय जागृत असलेल्या या देवीचा नवस फेडण्यासाठी हजारो भक्त दर रविवार, बुधवार व शुक्रवारी मंदिरात येत असतात. मंदिराचा संपूर्ण कारभार विश्वस्तांच्या माध्यमातून केला जातो.
चिमाजी अप्पाच्या काळातील मंदिर कौलारु आणि अतिशय छोटे होते. या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार १९७३ मध्ये करण्यात आला. त्याला आता ४९ वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय धारावी देवी मंदिर ट्रस्टने घेतला आहे. नवे मंदिर संपूर्णपणे काळ्या दगडाने बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात देणगी द्यावी, असे आवाहनही ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

सामाजिक कार्यदेखील अग्रेसर
धार्मिक उत्सवासोबतच ट्रस्टकडून सामाजिक कार्यदेखील केले जाते. दर वर्षी मिरा भाईंदरमधील विविध शाळांमधून शिकत असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क ट्रस्टकडून दिले जाते. याव्यतिरिक्त वैद्यकीय शिबिरांचे आयोजनही ट्रस्टकडून केले जाते. ट्रस्टची स्थापना १९९६ मध्ये झाली, त्याचे पहिले अध्यक्ष हरिश्चंद्र केशव पाटील हे होते. सध्या ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रवीण हरिश्चंद्र पाटील असून रमेश जगन्नाथ पाटील सचिव आणि विद्याधर रेवणकर हे खजिनदार आहेत.