डोंबिवलीकरांची गावदेवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीकरांची गावदेवी
डोंबिवलीकरांची गावदेवी

डोंबिवलीकरांची गावदेवी

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ४ (बातमीदार) : डोंबिवली शहरापासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर गावदेवीचे मंदिर आहे. हा रस्‍ता गावदेवी रोड म्हणून प्रसिद्ध आहे. डोंबिवली पूर्वेकडील अतिशय सुस्थितीत असलेले हे मंदिर मुख्य रस्त्याच्या कडेला आहे. शहरांमधील अनेक प्राचीन मंदिरांपैकी हे मंदिर आहे. हे मंदिर शांततापूर्ण असून, मंदिराच्या मुख्य भागात देवीची मूर्ती आहे. मंदिराच्या आत शनी देवाचीसुद्धा मूर्ती आहे. देवीच्‍या दर्शनासाठी मंगळवारी व शुक्रवारी येथे मोठी गर्दी असते. रोज पहाटे पाच वाजता नित्यनियमाने या देवीची पूजा केली जाते. १९६० च्या दशकामध्ये मंदिरामागे एक तलाव होता. मंदिराचा आकार हा अष्टकोनी व अद्वितीय आहे. आश्विन नवरात्र उत्सवासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर एक पवित्र स्थान आहे. मंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो.
गावदेवी मंदिराच्या बाजूला पिंपळ व वडाचे झाड आहे. गावदेवी मंदिराची स्थापना पांडुरंग नागो पाटील यांनी केली. हे गावदेवी मंदिर शंभर वर्षे जुने आहे. श्री पांडुरंग नागो पाटील यांना गावदेवीने कौल दिल्‍यानुसार त्यांनी १९८७ मध्‍ये मंदिर बांधायला सुरुवात केली; तर १९९१ मध्‍ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. या मंदिराचे सर्व व्यवस्थापन हे या मंदिराचे विश्वस्त सांभाळतात. दर वर्षी हनुमान जयंतीला देवीची पालखी ही पाथर्ली गावातून निघते. ती पालखी शेवटी मंदिरात आणली जाते. प्रत्येक पाच वर्षांनी देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.
नवरात्रीनिमित्त कार्यक्रम
नवरात्रीमध्ये देवीच्या भक्तांची मंदिरात मोठी गर्दी असते. नऊ दिवसांत देवीची ओटी भरण्‍याचा कार्यक्रम सुरू असतो. नवमीच्या दिवशी होम-हवन केले जाते. या दिवशी महाप्रसादाचेही आयोजन होते. डोंबिवलीतील स्थानिक तसेच डोंबिवलीबाहेरील भाविक या देवीच्या दर्शनासाठी दर वर्षी आवर्जून येतात, अशी माहिती श्री गावदेवी मंदिराचे विश्वस्त पांडुरंग नागो पाटील यांनी दिली.