सणाला ऑफर्सची लयलूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सणाला ऑफर्सची लयलूट
सणाला ऑफर्सची लयलूट

सणाला ऑफर्सची लयलूट

sakal_logo
By

वाशी, ता. ४ (बातमीदार) ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारापेठांमध्ये विविध ऑफर्समुळे उत्साह दिसून आला. या दिवशी कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने सोने-चांदी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह कपडे, मिठाईची दुकाने सजली आहेत.
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह असतो. या दिवशी सोन्याचे दागिने आणि चांदीच्या दागिन्यांना अधिक मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असला, तरी सणाला ग्राहक सोने खरेदीसाठी येईल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. त्यामुळे ग्राहकांच्या स्वागतासाठी शहारातील दुकाने सजली आहेत. यात सोन्याच्या एक ग्रॅमपासून नाणींसोबत चेन, अंगठी, हार, नेकलेस, पेंडल, कुंदन सेट, पाटल्या, बांगड्यांचे विविध प्रकार उपलब्ध असल्याने ग्राहकांना विविध पर्यायही उपलब्ध आहेत. याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनेदेखील खरेदी केली जात असल्याने दुचाकीविक्रेत्यांना कोरोनाकाळानंतर खऱ्या अर्थाने दोन पैसे कमावण्याची संधी मिळाली आहे.
---------------------------------------------------
बाजारपेठांमध्ये उत्साह
कंपन्यांनी ग्राहकांसाठी आर्थिक बचतीच्या ऑफर दिल्या आहेत. यंदा, ग्राहकांचा एलईडी खरेदीवर जास्त भर दिसून येत आहे. याशिवाय कपडे आणि मिठाई व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या मिठाई तयार केल्या आहे. मिठाईच्या दरातदेखील वाढ झालेली असली, तरीही ग्राहक मिठाई खरेदी करत आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केट, तसेच वाशी सेक्टर नऊ येथील कपडा मार्केटमध्ये गर्दी दिसून येत आहे.
------------------------------------------
वाहने धुणाऱ्यांची चलती
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या विजयादशमीच्या मुहूर्तावर घरातील वाहने धुऊन त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे शहरातील वाशिंग सेंटरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. अशातच सणामुळे अचानक नेहमीपेक्षा जास्त वाहने येत असल्यामुळे एकीकडे वॉशिंग सेंटरवाल्यांची चलती होती. मात्र, काही ठिकाणी आकारण्यात येणारे पैसे वाढवण्यात आल्याने वाहनचालकांमधून नाराजीची सूर उमटत होता.
-----------------------------
झेंडू १५० ते २०० रुपये किलो
नवी मुंबईतील किरकोळ बाजारात झेंडूची विक्री प्रतिकिलो १५० ते २०० रुपयाने सुरू होती. आंब्याच्या पानांचे तोरण हे ३० ते ५० रुपयांनी विकले जात आहे. अडीच फूट लांबीची तोरणे असून त्यापुढे तोरण फुटामागे २० रुपयांनी वाढीव दरांनी विकले जात आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे फुलांचे दर स्थिर आहेत. गणेशोत्सवाच्या तुलनेत फुलांच्या दरात घसरण झालेली आहे.