रुग्णालय भूखंडावरील अतिक्रमण उद्ध्वस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालय भूखंडावरील अतिक्रमण उद्ध्वस्त
रुग्णालय भूखंडावरील अतिक्रमण उद्ध्वस्त

रुग्णालय भूखंडावरील अतिक्रमण उद्ध्वस्त

sakal_logo
By

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा रोड येथील रुग्णालयाचे आरक्षण असलेल्या भूखंडावर झालेले अतिक्रमण मिरा-भाईंदर महनगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने उद्ध्वस्त केले. याच भूखंडावर महापालिकेच्या अद्ययावत रुग्णालयाचे येत्या ११ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन केले जाणार आहे.

मिरा रोड येथील आरक्षण क्रमांक ३०२ या जमिनीवर रुग्णालयाचे आरक्षण आहे. हे आरक्षण खासगी जमिनीवर आहे. जमीनमालक महापालिकेला टीडीआरच्या बदल्यात रुग्णालयाची इमारत बांधून देणार आहे; मात्र भूखंडावर अतिक्रण झाले असल्यामुळे पुढील प्रक्रिया थांबली होती. या रुग्णालयासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मिरा-भाईंदरमध्ये महापालिकेचे एकही अद्ययावत असे रुग्णालय नाही. मिरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात केवळ प्रसूती व इतर किरकोळ आजारांवर उपचार केले जातात. मात्र इतर आरोग्य सुविधा त्या ठिकाणी नसल्यामुळे सर्व आरोग्य सुविधांनीयुक्त अशा रुग्णालयाची मागणी केली जात होती.
कनाकिया रस्त्यावरील अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जमिनीवर होणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयामुळे रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या भूखंडावर वाहनदुरुस्ती गॅरेज तसेच दुकाने बेकायदेशीर थाटण्यात आली होती. मंगळवारी त्यावर कारवाई करून ती उद्ध्वस्त करण्यात आली.

चौकट
जमीनमालक स्वत:च इमारत बांधून देणार
रुग्णालयाचे आरक्षण असलेल्या भूखंडावर जमीनमालक स्वत:च इमारत बांधून देणार असल्यामुळे महापालिकेचा पैसा वाचणार आहे. मात्र इतर अद्ययावत आरोग्य सुविधांसाठी निधी मंजूर करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला केली होती. राज्य सरकारने रुग्णालयासाठी २५ कोटी रुपये मंजूर केले असल्यामुळे या निधीतून अद्ययावत आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.