दसरा मेळाव्याचे चोख नियोजन अन् बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळाव्याचे चोख नियोजन अन् बंदोबस्त
दसरा मेळाव्याचे चोख नियोजन अन् बंदोबस्त

दसरा मेळाव्याचे चोख नियोजन अन् बंदोबस्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ४ : मुंबईत प्रतिष्ठेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. दादरच्या शिवाजी पार्कात ठाकरे गटाच्या होणाऱ्या मेळाव्यासाठी ‘मिनीट टू मिनीट’ नियोजनाची लगबग सुरू होती. मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा, तर पोलिस यंत्रणेकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत होता. मेळाव्यादरम्यान कोणतीही अनूचित घटना घडणार नाही, याची खबरदारी घेणारी परेड मुंबई पोलिसांकडून आज झाली.

पोलिसांसोबतच शिवसेनेच्या नेत्यांनीही संपूर्ण तयारीचा आढावा आज दसरा मेळाव्याच्या पूर्वसंध्येला घेतला. दुसरीकडे बीकेसीत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कातही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जोरदार तयारी पोलिसांकडून करण्यात आली. आज शिवसेनेतील नेत्यांपैकी भास्कर जाधव तसेच अनिल परब यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला.

दरम्यान, मुंबईत आज यवतमाळ, जळगाव, जालना, लातूर, अमरावती यांसारख्या भागातून सर्वसामान्य कार्यकर्ते यायला सुरुवात झाली. अनेकांनी स्वखर्चाने मुंबई गाठली. कोणत्याही व्यवस्थेची वाट न पाहता स्वेच्छेने शिवसैनिक मुंबईत दाखल झाले. त्यापैकी काहींनी दादर परिसरातच मुक्कामाची व्यवस्था केली आहे. पदाधिकारी मात्र रातोरात प्रवास करत उद्या (बुधवारी) सकाळी मुंबईत दाखल होतील, असे सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात येता आले नाही. मी १९८५ पासून दसरा मेळाव्यासाठी अखंडितपणे लातूरच्या किल्लारीहून मुंबई गाठतो, असे देविदास भोसले यांनी सांगितले. भोसले यांनी बाळासाहेबांनी पावसात घेतलेल्या सभेचीही आठवण बोलून दाखवली.

शिवाजी पार्कातील आढावा
- साडेतीन हजार ते चार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था
- उर्वरित कार्यकर्त्यांसाठी कार्पेट टाकून खालीच बसण्याची व्यवस्था
- जागेची मर्यादा लक्षात घेऊन ४० हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीचा अंदाज
- मैदानात पोहचू न शकणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एलसीडी स्क्रिनचीही व्यवस्था

पोलिस अलर्ट
पोलिस प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मेळाव्याच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. मुंबईत कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस वर्गाला अलर्ट राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून कोणत्याही प्रसंगासाठी अलर्ट राहण्याचेही आदेश त्यांनी यावेळी दिले.
 
वाहतूक व्यवस्थेत बदल
शिवाजी पार्कच्या दिशेने उद्या (बुधवार) येणारा वाहनांचा मोठा ताफा लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच अनेक मार्गांवर प्रवेशासाठीही वाहतूक पोलिसांनी मज्जाव केला आहे. अनेक ठिकाणी व्हीआयपी वाहनांसाठीही मार्गांच्या तयारीचा आढावा आज पोलिसांकडून घेण्यात आला.

यंदाचा दसरा मेळावा अभूतपूर्व होईल. कार्यकर्त्यांची रिघ मंगळवारपासून सुरू झाली. न भूतो न भविष्यती अशा ऐतिहासिक मेळाव्याला आणि सणाला हजेरी लावण्यासारखा यंदाचा मेळावा असेल. देश-विदेशातून या मेळाव्याला शिवसैनिक येत आहेत.
- भास्कर जाधव, शिवसेना नेते