वन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ
वन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ

वन कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, देशातील नागरी संपत्तीप्रमाणेच वने व वन्यजीव ही वन संपत्ती फार महत्त्‍वाची आहे. नागरी संपत्तीचे आणि मनुष्याचे संरक्षण करताना जीव धोक्यात घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना राज्य शासनातर्फे विविध लाभ देण्यात येतात. तसेच लाभ वनांचे संरक्षण करताना जीव धोक्यात घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना मिळावेत, ही वन कर्मचाऱ्यांची मागणी काही वर्षे प्रलंबित होती. वन विभागाच्या प्रस्तावानुसार वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करताना दुदैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल. जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली तर सदर मृत वन कर्मचाऱ्यांच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन सदर कुटुंबाला देण्यात येईल. तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंत वहन करण्याचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे वन कर्मचाऱ्यांना आता भरीव लाभ मिळणार आहे. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य वाढेल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.