आंबिवली रेल्वे स्थानकामधून जीवघेणा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबिवली रेल्वे स्थानकामधून जीवघेणा प्रवास
आंबिवली रेल्वे स्थानकामधून जीवघेणा प्रवास

आंबिवली रेल्वे स्थानकामधून जीवघेणा प्रवास

sakal_logo
By

कल्याण, ता. ६ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या आंबिवली आणि शहाड रेल्वेस्थानकामध्ये रेल्वेने पादचारी पूल सुविधा दिली असताना अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करत आहेत. याबाबत रेल्वेची सुरक्षा यंत्रणा काय करते, असा सवाल केला जात आहे.
कल्याण ते कसारा या रेल्वे मार्गावर शहाड आणि आंबिवली रेल्वेस्थानक असून प्रतिदिन या दोन रेल्वे स्थानकांमधून दीड लाखाहून अधिक प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. शहाड रेल्वेस्थानकामध्ये पादचारी पुलासोबतच सरकते जिने असून आंबिवली रेल्वेस्थानकामध्ये सरकत्या जिन्याचे काम सुरू आहे. शिवाय येथे दोनच फलाट आहेत. दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढत असल्याने मध्य रेल्वेने विविध सुविधा देण्यास सुरुवात केले आहे.
आंबिवली आणि शहाड रेल्वेस्थानक हे टिटवाळा रेल्वे सुरक्षा बलाच्या अंतर्गत येत येतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सुरक्षा बल कर्मचाऱ्यांचा धाक राहिला नसल्याने प्रवासी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. फलाटावर बेकायदेशीर फेरीवाल्यांचा वावर असल्याने ते टाकत असलेल्या कचऱ्याने फलाटावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच गर्दुल्ले आणि भिकारी वर्गाचा वावर यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त आहेत.

चौकट
इच्छाशक्तीचा अभाव
शहाड, आंबिवली, टिटवाळा येथे रेल्वे रूळ पार करणाऱ्या प्रवाशांविरोधात किमान सलग सात दिवस तैनात रेल्वे सुरक्षा बळ यांच्याकडून दंडात्मक कारवाई वा गुन्हे दाखल करायला हवेत. हे रेल्वे रूळ पार करण्याविरोधात कारवाई करण्याबाबत इच्छाशक्ती नसल्याचा आरोप कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव श्याम उबाळे यांनी केला आहे.

कोट
मी आताच पदभार घेतला असून आंबिवली आणि शहाड रेल्वेस्थानकामधील समस्या समजली आहे. आगामी काळात जनजागृती सोबत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वे रूळ ओलांडून प्रवासी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
- ऋषीकुमार शुक्ला, आयुक्त, सुरक्षा बल, मध्य रेल्वे वरिष्ठ मंडळ.