‘वॉटर प्लस’च्या अभावामुळे मिरा-भाईंदर तिसऱ्यास्थानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वॉटर प्लस’च्या अभावामुळे मिरा-भाईंदर तिसऱ्यास्थानी
‘वॉटर प्लस’च्या अभावामुळे मिरा-भाईंदर तिसऱ्यास्थानी

‘वॉटर प्लस’च्या अभावामुळे मिरा-भाईंदर तिसऱ्यास्थानी

sakal_logo
By

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : काही दिवसांपूर्वीच घोषित झालेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मिरा- भाईंदर महापालिका देशात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. कचरामुक्त शहर व वॉटर प्लस या दोन मुद्द्यांवर कमी गुण मिळाल्याने महापालिका म्हैसूर व नोएडा यांच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर आली.
तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात मिरा-भाईंदर महापालिका देशात तिसरी व राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन क्रमांकासाठी म्हैसूर व नोएडा यांच्यात जोरदार चुरस होती. मात्र म्हैसूर शहराने बाजी मारत पहिला क्रमांक पटकावला; तर नोएडा व मिरा भाईंदर अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आले. सर्वेक्षणात विविध मुद्द्यांसाठी एकंदर ७५०० गुण ठेवण्यात आले होते. यापैकी मिरा-भाईंदरला ५,९६७ गुण प्राप्त झाले. वॉटर प्लस व कचरामुक्त शहर या दोन बाबींवर कमी गुण मिळाल्याने मिरा भाईंदरला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
महापालिकेला वॉटर प्लस सर्वेक्षणात गुण गमवावे लागले आहेत. महापालिकेच्या सात मलनिस्सारण केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होत असली, तरी अनेक ठिकाणी नाल्यांचे काळे पाणी थेट खाड्यांमध्ये जात असल्याची बाब सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दिसून आली. महापालिकेने बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहातदेखील काही सुविधांची कमतरता दिसून आली. महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीनची सुविधा असणेही आवश्यक होते. या सर्व कमतरतेमुळे महापालिकेला सुमारे नऊशे गुण कमी मिळाले. त्यामुळेच मिरा भाईंदरला देशात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

कचरामुक्तीसाठी तीन स्टार मानांकन
कचरामुक्त शहरासाठी मिरा-भाईंदरला तीन स्टार मानांकन मिळाले आहेत. यात पाच स्टार मिळणे आवश्यक होते. मिरा-भाईंदर शहर स्वच्छ असले, तरी सर्वेक्षणासाठी शहर चोवीस तास स्वच्छ ठेवणे आवश्यक होते. शहरात दोन वेळा स्वच्छता केली जाते. पण रात्रीच्या वेळी अनेक जण रस्त्यावर कचरा फेकत असतात, तो सकाळी उचलला जातो. शिवाय कचरा वर्गीकरणात म्हणावी तशी समाधानकारक कामगिरी झालेली नाही. नागरिक अजूनही ओला व सुका कचरा स्वतंत्र करत नसल्यामुळे पन्नास टक्के कचरा एकत्रित उचलला जातो. या दोन्ही मुद्द्यांवर महापालिकेला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत.

...
महापालिकेने आता सार्वजनिक स्वच्छतागृहांवर लक्ष केंद्रित केले आहे. या स्वच्छतागृहांमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि त्याची जबाबदारी कंत्राटदारावरच दिली जाणार आहे. शहर स्वच्छता रात्रीच्या वेळीदेखील केली जाणार आहे. या वेळी मुख्य रस्ते यांत्रिक पद्धतीने स्वच्छ केले जाणार आहेत. शिवाय बाजार परिसरात कचरा कुंड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. कचरा वर्गीकरणासाठी रहिवासी सोसायट्यांमध्ये जागृती, शाळा, महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन आदी उपक्रम राबवले जाणार आहे. जेणेकरून पुढील सर्वेक्षणात महापालिका आणखी चांगली प्रगती करेल.
- रवी पवार, उपायुक्त, मिरा भाईंदर महापालिका