आमदार गीता जैन शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार गीता जैन शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित
आमदार गीता जैन शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित

आमदार गीता जैन शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित

sakal_logo
By

भाईंदर, ता.६ (बातमीदार): भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्याला उपस्थिती लावली. जैन यावेळी व्यासपीठावर बसलेल्या दिसून आल्यामुळे मिरा भाईंदर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली होती. गीता जैन नेमक्या कुठे अशा आशयाचे संदेश समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरले होते. आपण भाजपमध्येच असून पक्षश्रेष्ठींशी बोलल्यानंतरच मेळाव्याला उपस्थित राहिले, असा खुलासा गीता जैन यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार गीता जैन शिवसेनेसोबत होत्या. मात्र सत्ताबदलानंतर शिंदे गटाच्या आमदारांसोबत शिवसेनेची साथ सोडलेल्या दहा अपक्ष आमदारांमध्ये गीता जैन यांचाही समावेश होता. त्यावेळी त्यांनी भाजपसोबत असल्याचे जाहीर केले. मात्र त्यावेळी त्यांना शिंदे गट असलेल्या गुवाहाटीला पाठवण्यात आले होते. त्यानंतर गेले दोन महिने त्या भाजपमध्येच सक्रीय आहेत. या पार्श्वभुमीवर गीता जैन यांनी शिंदे गटाने बीकेसीवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यांचे व्यासपीठावर बसलेले छायाचित्र व्हायरल झाले होते.
मात्र या सर्वांचा खुलासा आमदर गीता जैन यांनी केला आहे. आपल्या विरोधात काहीच हाती लागत नसल्यामुळे विरोधक ही कामे करत आहेत. सत्ताबदलाच्या काळात ज्या पन्नास आमदारांनी महत्त्वाची भुमिका बजावली त्यात आपणही असल्यामुळे दसरा मेळाव्याला आपल्याला बोलावून व्यासपीठावर बसवण्याचा मान देण्यात आला. भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच आपण दसरा मेळाव्याला उपस्थित राहिलो. आपण भाजपसोबतच आहोत असे गीता जैन यांनी स्पष्ट केले आहे.