६६ वर्षीय वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६६ वर्षीय वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला
६६ वर्षीय वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला

६६ वर्षीय वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : वरळी सी-लिंकवर झालेल्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी तिघे जण भारतातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून मुंबईत नोकरी करण्यासाठी आले होते. यापैकी तीन मृतदेह बुधवारीच नातेवाईक येऊन संबंधित राहत्या ठिकाणी घेऊन गेले; तर उर्वरित दोन मृतदेह नेण्यासाठी गुरुवारी नातेवाईक आले होते. यापैकी एकाचे कुटुंब उत्तर प्रदेशच्या झांसी खेडीवरून आले होते.
४० वर्षीय राजेंद्र कुमार सिंगल हे कुमार कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष होते, हे सांगत असताना राजेंद्र कुमार यांचे वडील ६६ वर्षीय जैतराम यांच्या अश्रूंचा बांध फुटला. उतारवयात मुलाने आधार द्यायच्या वेळेस त्यांचा अखेरचा निरोप घेतला. राजेंद्र कुमार यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. मध्यरात्री ३ वाजता राजेंद्रच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती फोनवरून मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. चार ते पाच वर्षांपासून राजेंद्र सी-लिंकवर एनपीएस कंपनीच्या अंतर्गत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. मुले मोठी होत आहेत, त्यांच्यासाठी पैसा कमावणे गरजेचे आहे. त्यामुळे राजेंद्र परिवार सोडून मुंबईत आले होते. वांद्रे येथील माऊंटमेरी इथे ते एका खोलीत भाड्याने राहत होते, पण आता राजेंद्रच्या अचानक जाण्याने कुमार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
...
वृद्ध आईवडील पोहोचू शकले नाहीत
मध्य प्रदेशमधील राजगड बावडीखेडा येथे राहणारे ४२ वर्षीय गजराज सिंहचे वृद्ध आईवडील रुग्णालयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा चुलतभाऊ कृष्णपाल सिंह आणि गावाचे सरपंच सुजाण सिंह यांनी मोबदल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. गजराज त्यांच्या संपूर्ण गावात एकमेव एवढे शिकलेले होते. गजराज यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, १३ वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा आहे. हे सर्व कुटुंब आता विवंचनेत आहे. राजस्थानमधील सत्येंद्र सिंग यांचाही मृतदेह त्यांचे नातेवाईक रात्री उशिरा घेऊन गेल्याची माहिती नायर रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
...
एनपीएस कंपनीतर्फे मृतांच्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. मृतदेह राहत्या घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या सोयीपासून त्यांच्या जेवणापर्यंतची सर्व सुविधा कंपनीतर्फे देण्यात आली आहे. तसेच राजस्थानमधील नातेवाईकांना विमानाने पाठवण्यात आले. कंपनीकडून जी काही आर्थिक मदत आणि इतर मोबदला मिळेल तो त्यांना दिला जाईल. त्यांची जबाबदारी आमची आहे. त्यांना एफआयआर आणि विम्याची कॉपी देण्यात आली आहे.
- विजय माधव शिंदे, एरिया ऑफिसर, एनपीएस कंपनी