उधवा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उधवा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू
उधवा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

उधवा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

sakal_logo
By

कासा, ता. ६ (बातमीदार) : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळा, उधवा, कासपाडा येथे सातवीत शिकत असलेल्या १३ वर्षीय आदिवासी मुलीचा मृत्यू झाला. निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या मिताली सुरेश चौधरी (वय १३, रा. उधवा, केवडीपाडा) हिची बुधवारी (ता. ५) पहाटेच्या सुमारास अचानक तब्येत बिघडल्याने तिला उधवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार केले; पण प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी खानवेल येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला.

मितालीला ताप येत असल्याने मंगळवारी (ता. ४) प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते; पण तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिला असलेल्या शिकलसेल आजाराविषयी कोणतीही कल्पना दिली नाही. तिच्या आजाराविषयीची कल्पना डॉक्टरांना दिली असती, तर तिच्यावर वेळीच योग्य ते उपचार केले असते. शिक्षकांनी मुलगी आजारी असल्याची माहिती पालकांना देऊन तिला वेळीच रुग्णालयात दाखल करावयास पाहिजे होते. त्यामुळे मृत्यूस आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

मुलीची तब्येत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने खानवेलला पाठविले. तिच्या शिकलसेल आजाराची कल्पना दिली असती, तर वेळीच योग्य ते उपचार करता आले असते.
- डॉ. रितेश पटेल, आरोग्य अधिकारी

सदर विद्यार्थिनीने याच वर्षी नव्याने प्रवेश घेतला होता. सदर प्रकाराची आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत चौकशी समिती गठित केली आहे. समितीच्या सविस्तर अहवालानंतर तिच्या मृत्यूचे कारण समजेल.
- उमेश काशीद, सहायक प्रकल्प अधिकारी, डहाणू