महाराष्ट्रातील कांदळवन, खाडीपात्रात गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील कांदळवन, खाडीपात्रात गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद
महाराष्ट्रातील कांदळवन, खाडीपात्रात गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद

महाराष्ट्रातील कांदळवन, खाडीपात्रात गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद

sakal_logo
By

गोबिड माशांच्या २१ प्रजातींची नोंद
कांदळवन परिसंस्था समजून घेणे होणार सोपे

मुंबई
महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला राज्यातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांची विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबवण्यासाठी दिला होता. ‘बीएनएचएस’ने जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२१ दरम्यान केलेल्या अभ्यासादरम्यान एकूण २१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद करण्यात आली. कांदळवन परिसंस्था अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

आकाराने छोटा असलेला गोबिड मासा कांदळवन परिस्थंस्थेत महत्त्वाचा मासा मानला जातो. जैवसाखळीतही त्याचे महत्त्व मोठे आहे. अशा माशांच्या २१ प्रजातींची नोंद एका अभ्यासाच्या माध्यमातून झाली आहे हे विशेष. महाराष्ट्रातील अनेक कांदवन क्षेत्र आणि खाड्यांच्या ठिकाणी झालेल्या अभ्यासातून त्यांच्या प्रजातींबाबतची माहिती समोर आली आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून प्रथमच नोंद झालेल्या प्रजातींच्या सात नवीन नोंदी अभ्यासात देण्यात आल्या आहेत. अभ्यासादरम्यान २५ स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले. लहान-मोठ्या खाड्या, मडफ्लॅट्स, कांदळवन आणि संबंधित अधिवास यांचा त्यात समावेश आहे. ठाणे, पनवेल, धरमतर, कुंडलिका, सावित्री, आंजर्ले, दाभोळ, जयगड, काजळी, वाघोटण आणि कराळी आणि इतर अनेक लहान-मोठ्या खाड्यांचा अभ्यास सर्वेक्षणादरम्यान करण्यात आला.

‘गोबिड माशांवर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणावर अभ्यास केला गेला आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातील प्रमुख कांदळवन आणि नदीच्या किनारी भागात त्यांची विविधता आणि अधिवास समजून घेता आला. नव्या माहितीमुळे कांदळवन परिसंस्था अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यांच्या संवर्धनास मदत होईल याची खात्री आहे,’ असे कांदळवन कक्षाचे अप्पर मुख्य वनरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले.

‘गोबिड’ माशांचा एक प्रतिष्ठित गट आहे. ज्यांच्या प्रजाती ओळखणे अत्यंत कठीण आहे. एकात्मिक वर्गीकरण पद्धतीचा वापर करून नवीन अभ्यासाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील गोबिड माशांच्या प्रजातींची पहिली माहिती समोर आणली आहे. नवीन अभ्यासामुळे आम्हाला महत्त्वाच्या गोबिड मत्स्यक्षेत्राचे वर्णन करण्यास मदत होईल.
- उन्मेष काटवटे, मत्स्यशास्त्रज्ञ, बीएनएचएस

जैवविविधतेत भर
कांदळवनाच्या मुळांच्या जटिल जाळ्यामुळे अनेक जलचरांसाठी उत्तम संरक्षित अधिवास मिळतो. चिखलातील पोषणद्रव्ये शोषण्याची खास व्यवस्था असल्याने मासे, कोळंबी, खेकडे, पाणपक्षी इ. अंडी घालण्यासाठी व अन्नग्रहणासाठी कांदळवनाच्या जंगलात येतात. त्यामुळे जैवविविधतेत भर पडत जाते.

कांदळवन परिस्थंस्थेत महत्त्वाचा मासा
महाराष्ट्र ते सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गोबिड माशाच्या अनुषंगाने अतिशय थोडा अभ्यास झालेला आहे. याआधीचा सर्वात दुर्मिळ असा तपशील १८३७ सालचा आहे. अतिशय तुरळक असे दाखले गोबिड माशाच्या अभ्यासाच्या निमित्ताने आढळतात. यंदा मात्र मुंबई ते सिंधुदुर्ग अशा सागरी किनारपट्टी आणि खाडी भागात अशा माशांच्या प्रजातीचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यांची नेमकी संख्या आणि प्रजातींचे प्रकार समजण्यासाठी त्याची मदत झाली. कांदळवनाच्या इकोसिस्टीममध्ये गोबिड मासा महत्त्वाचा घटक आहे, अशी माहिती कांदळवन कक्षातील अधिकारी आणि संशोधन आणि विकास  सहायक संचालक मानस मांजरेकर यांनी दिली.

अन्नसाखळीतही महत्त्व
गोबिड माशाला व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व नाही. हे मासे कोणी खातही नाही. मोठ्या माशांचे खाद्य आहे. मोठ्या माशांसाठी अन्नसाखळीत गोबिड मासे खाद्य आहे. त्यामुळेच पर्यावरणीय साखळीत गोबिड माशांचे अतिशय महत्त्व आहे. कांदळवण क्षेत्रातही त्याचा भक्ष्य म्हणून वापर होत असल्याने त्यांचे अस्तित्व पर्यावरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे.