पावसामुळे बांधकाम पडल्यानंतरही विमा भरपाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसामुळे बांधकाम पडल्यानंतरही विमा भरपाई
पावसामुळे बांधकाम पडल्यानंतरही विमा भरपाई

पावसामुळे बांधकाम पडल्यानंतरही विमा भरपाई

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ (वार्ताहर) : नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस, चक्रीवादळामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडून भरपाई मिळत नाही; मात्र विमाधारकाने मुसळधार पावसाने बांधकाम केलेल्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पुरावे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे सादर केले. मंचाचे अध्यक्ष व्ही. सी. प्रेमचंदानी आणि सदस्य पूनम महर्षी यांनी विमा कंपनीला नुकसान भरपाईपोटी १० लाख रुपये १२ टक्के व्याजदराने दावेदाराला देण्याचा निकाल दिला.

विमाधारक भारत भानुशाली यांनी भानुशालीवाडी, असल्फा या ठिकाणी खरेदी केलेल्या बांधकामाचा १० लाख रुपयांचा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे २०११ मध्ये काढला होता. हा विमा नैसर्गिक आपत्ती, पाऊस, चक्रीवादळ आणि आग यांच्यापासून संरक्षित होता. १८ जुलै २०११ रोजी मुसळधार पावसाने बांधकामाचे नुकसान झाले. भानुशाली यांनी विमा कंपनीकडे भरपाई द्यावी अशी मागणी केली; मात्र कंपनीने भरपाई देण्याची मागणी फेटाळून लावली. प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे आले. यात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी विमाधारकाची मागणी फेटाळण्यासाठी सबळ पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरले; तर विमाधारकाने नैसर्गिक आपत्ती मुसळधार पाऊस, शपथपत्र, पॉलिसीची प्रत आदी सबळ पुरावे सादर केले. अखेर मंचाने ओरिएंटल कंपनीला विमाधारक भानुशाली यांना नुकसान भरपाईपोटी मदत देण्याचा निकाल दिला.