पेंग्विन ठरलाय मुंबईतील मुख्य आकर्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेंग्विन ठरलाय मुंबईतील मुख्य आकर्षण
पेंग्विन ठरलाय मुंबईतील मुख्य आकर्षण

पेंग्विन ठरलाय मुंबईतील मुख्य आकर्षण

sakal_logo
By

‘खर्चिक’ पेंग्विनमुळे तिजोरीत भर
राणीबागेत आठवड्याला ४० हजार पर्यटकांची हजेरी; वर्षाला २५ कोटींचा महसूल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : अंटार्क्टिका खंडातील अतिथंड हवामानातील पेंग्विन मुंबईसारख्या दमट वातावरणात आणणे मोठे धाडसाचे होते; पण तो प्रयत्न यशस्वी झाल्याने राणीबागेतील पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एरवी टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनवर दिसणारे पेंग्विन प्रत्यक्षात बघायला मिळाल्याने मुंबईकरही सुखावले आहेत. पेंग्विनच्या आगमनामुळे राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांच्या प्रमाणात २५ टक्के वाढ झाल्याचा निष्कर्षही नोंदवण्यात आला आहे. एकीकडे पेंग्विनसाठी चार वर्षांत तब्बल २० कोटींचा खर्च करण्यात आला असला, तरी पालिकेच्या तिजोरीत महसुलाच्या रूपात २५ कोटींची भर पडली आहे.
२०१७ मध्ये दक्षिण कोरियातून राणीबागेत आठ हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च आला होता. आठपैकी एकाचा त्या वेळी दोन महिन्यांतच मृत्यू झाला. सध्या राणीच्या बागेत सात मोठे पेंग्विन असून दोन पिल्ले आहेत. २०१७ मध्ये पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, पेंग्विन सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. राणी बागेतील गर्दी वाढल्याने महसुलातही वाढ होत आहे. सध्या वर्षाला २५ कोटींचा महसूल गोळा होत आहे. चार वर्षांत १०० कोटींहून अधिक महसूल मिळाल्याचे सांगण्यात आले.

पेंग्विनवर अमाप खर्च
१. वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या घरांसाठी तब्बल ५ ते ९ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.  पेंग्विनच्या देखभालीसाठी उद्यान विभागाने पैशांची उधळपट्टी केली असून चार वर्षांत तब्बल १९.११ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्राणिसंग्रहालयातील उद्यानांच्या देखभालीसाठी तब्बल ९.५२ कोटी खर्च
२. पेंग्विन आणायचा खर्च अडीच कोटी. घरासाठी १० कोटी. देखभालीसाठी पहिली तीन वर्षे १० आणि नंतर २०२४ पर्यंत १५ कोटी. पेंग्विन वाहतूक व सुरक्षा, वैद्यकीय पथक, कुशल कामगार इत्यादींवर १० कोटी असा एकूण साधारण ५० कोटी खर्च करण्यात आला आहे.

राजेशाही थाट
- राणीबागेतील प्राण्यांच्या एका घराची  किंमत ः ५ ते ९ कोटी
- पेंग्विनच्या देखभालीवर चार वर्षांतील खर्च ः १९ कोटी
- राणीबागेच्या नूतनीकरणावर खर्च ः २४३.६५ कोटी
- पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी खर्च ः १० कोटी
- २०२१ ते २०२४ वर्षासाठी पेंग्विनच्या देखभालीसाठी निविदा खर्च ः १५ कोटी
- वार्षिक सरासरी खर्च ः ५ कोटी. महिन्याचा साधारण खर्च ः ४२ लाख
- दिवसामागे साधारण खर्च ः १ लाख ४१ हजार
- पेंग्विन २४ तास डॉक्टरांच्या कायमस्वरूपी पथकाच्या निगराणीखाली

पेंग्विनची वैशिष्ट्ये
- साधारण वयोमान एक ते तीन वर्षे
- वजन साधारण १ ते २.५ किलोग्रॅमदरम्यान
- मांसाहारी पक्षी. दररोज एक किलोग्रॅम छोटे मासे. मासे आवडीचा आहार

राणीबागेचा इतिहास
१. ब्रिटिशकाळात इंग्लंडची राणी क्वीन व्हिक्टोरिया यांच्यासाठी १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळ्यात उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उभारण्यात आले. ही बाग ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. मुंबईमधील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. या बागेचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. नंतर या बागेचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय असे करण्यात आले.
२. राणीबागेत २८६ प्रजातींचे ३,२१३ वृक्ष आणि ८५३ वनस्पती आहेत. त्याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटकांचे वास्तव्य उद्यानात आहे. बागेत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. राणीबाग पर्यटकांचे आणि विशेषकरून बच्चे कंपनीचे आवडीचे ठिकाण आहे.

नूतनीकरणावर २५० कोटींचा खर्च
पालिकेने राणीबागेच्या नूतनीकरणावर अलीकडेच साधारण २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातील कामाचा केवळ पहिला टप्पाच पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. दरम्यान राणीबागेच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला. त्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आली. तेव्हापासून कामाची गती आणखी मंदावली. त्यामुळे कामाचा खर्च मात्र वाढत असल्याचे दिसते. पेंग्विनवरील खर्च पांढरा हत्ती ठरला आहे. अलीकडेच झालेल्या अवाढव्य खर्चामुळे उद्यान विभागाला सिंह, झेब्रा, जिराफ, चित्ते, मगरी इत्यादींसारखे प्राणी आणता आलेले नाहीत.

नवीन प्राण्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सोमवार ते शुक्रवार सुमारे चार हजार पर्यटक  राणी बाग पाहण्यासाठी येत होते. आता ती संख्या १३ हजारांच्या वर गेली आहे.  शनिवारी-रविवारी तर २५ हजारांहून अधिक पर्यटक उद्यानाला भेट देत आहेत. उद्यानामध्ये झालेले आधुनिक बदल आणि नवीन पाहुण्यांच्या आगमनामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे.
- डॉ. संजय त्रिपाठी, संचालक, राणी बाग