ठाण्यात मेट्रोचे काम कूर्मगतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात मेट्रोचे काम कूर्मगतीने
ठाण्यात मेट्रोचे काम कूर्मगतीने

ठाण्यात मेट्रोचे काम कूर्मगतीने

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ९ : राज्य सरकारकडून २०१६ मध्ये मेट्रो प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून ५४ महिन्यांचा निर्धारित कालावधीही देण्यात आला होता. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेले काम, त्यात मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव यांमुळे नियोजन बिघडल्याने त्याचा परिणाम मेट्रोच्या कामावर झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामाचा खर्च वाढला असून हा प्रकल्प आता २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिवसेंदिवस ठाणे शहराची व आसपासच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत ही वाढ होऊन कोंडीची समस्या देखील भेडसावत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा पर्याय समोर आला. यावर उपाययोजना म्हणून राज्य सरकारने मेट्रो-४ च्या प्रस्तावाला मान्यता देत १४ हजार ५४९ कोटींचा निधी निर्धारित करण्यात आला. २५ ऑक्टोबर २०१६ ला शासन निर्णय जारी करत या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला २८३ कोटी २१ लाखांचा निधी देण्यात आला असून मेट्रोच्या कामासाठी ५४ महिन्यांचा निर्धारित कालावधीही देण्यात आला होता.

२०२६ मध्ये काम पूर्ण होण्याची शक्यता
मेट्रो-४ च्या कामासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीला २०२२ मध्ये काम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे टाळेबंदी, कामाचे नियोजनात झालेला बिघाड यामध्ये भूसंपादनाचा प्रश्न, कर्मचाऱ्यांचा प्रश्न आदी कारणांमुळे मेट्रोचे काम रखडले. त्यात २०१६ मध्येच ५४ महिन्यांची मुदतही संपुष्टात आल्यानंतर पुन्हा ३३ महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ दिल्याने आता हा प्रकल्‍प २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
-------------------------------------------------------
घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी रारू लागली आहेत. त्यामुळे मेट्रोच्या जाळ्याचा फेरविचार झाला आणि मेट्रोचे जाळे गायमुखपर्यंत विस्तारित करण्यात आले. ३५.३८ किमीची विस्तारित मेट्रो ही वडाळा येथून मेट्रो-४ च्या प्रकल्पाची सुरुवात असून मेट्रो मार्गिका ही अमर महल चेंबूर-घाटकोपर-विक्रोळी-मुलुंड-ठाणे-कासरवडवली आणि त्यापुढे गायमुखपर्यंत विस्तारित आहे.

मेट्रो-४ च्या सल्लागार कंपनीच्या अंगावरच मार्गावरील ३२ स्थानकांची जबाबदारी देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा तणाव वाढला. त्यामुळे विकासकामाचा टक्का घसरला असून ३८ टक्क्यांवर आला असल्याचा दावा एमएमआरडीएने केला. मात्र, महामारीच्या दोन वर्षांनी मेट्रोच्या विकास गतीला खीळ बसली आणि कामे सुरू असली तरीही निर्णयापर्यंत पोहचलेली नाहीत.