प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पकडली गाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पकडली गाडी
प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पकडली गाडी

प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पकडली गाडी

sakal_logo
By

नितीन देशमुख ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : पनवेल रेल्वे स्थानकात दिवा-पनवेल गाडी शनिवारी सकाळी नेहमीच्या फलाटाऐवजी मालगाडीच्या ट्रॅकवर आल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. जीव धोक्यात टाकून रेल्वे रुळांवर उड्या टाकून प्रवाशांना गाडीत चढावे लागले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी स्टेशन उपप्रबंधकांना जाब विचारल्यावर गाडी २० मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
दिवा-पनवेल गाडी नंबर ०१३४७ सकाळी ९.२० वाजता पनवेल स्थानकावर ६ किंवा ७ फलाटावर येते, परंतु शनिवारी सकाळी ही गाडी अचानक मालगाडीच्या ट्रॅकवर आली. त्यामुळे प्रवासी गोंधळून गेले. मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या ट्रॅकच्या मध्ये हा ट्रॅक असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी फलाटावरून उड्या मारून जीव धोक्यात घालून जावे लागले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना असे चढून जाणे अवघड असल्याने अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी पनवेलच्या उपप्रबंधकांना याबाबत जाब विचारून सर्व प्रवासी गाडीत बसेपर्यंत गाडी सोडू नका, असे सांगितल्यावर गाडी २० मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आरपीएफच्या जवानांनी गाडीत चढण्यास मदत केली.
पनवेल स्टेशनच्या सिग्नलमनला मालगाडी येत असल्याची चुकीची माहिती कळंबोली स्थानकाकडून मिळाल्याने त्याने ही गाडी मालगाडीच्या ट्रॅकवर घेतल्याची माहिती स्टेशन उपप्रबंधक बिजू जॉर्ज यांनी दिली. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी २० मिनिटे थांबवल्याचेही त्यांनी सांगितले, पण यामुळे धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडण्याचा गुन्हा प्रवाशांना करावा लागला.
...
मी रोहा येथे जाण्यासाठी फलाटावर उभा होतो. माझ्या बाजूला पेणला जाण्यासाठी राहुल शिवतरे हे दिव्यांग आपल्या आईसह होते. गाडी मालगाडीच्या ट्रॅकवर आल्याने आम्हाला काय करावे समजेना. फलाटावरून उडी मारणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही गोंधळून गेलो. मी पनवेलच्या उपप्रबंधकांना आम्हाला या गाडीने जायचे आहे. तुम्ही गाडी पुन्हा फलाटावर आणा नाही तर आम्ही बसल्याशिवाय गाडी सोडू नका असे सांगितले. मग त्यांनी गाडी थांबवून ठेवली. हा प्रवाशांच्या जिवाशी खेळ असल्याने याची चौकशी करून कारवाई होणे गरजेचे आहे.
- प्रकाश विचारे, अध्यक्ष, अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघ
----------------