परतीच्या पावसाचा शेतकऱ्याला दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परतीच्या पावसाचा शेतकऱ्याला दणका
परतीच्या पावसाचा शेतकऱ्याला दणका

परतीच्या पावसाचा शेतकऱ्याला दणका

sakal_logo
By

उरण, ता. ९ (वार्ताहर) : परतीच्या पावसाने उरण भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने तयार झालेले पीक जमीनदोस्त झाले असल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
उरण तालुक्याला परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या पावसामुळे मोठ्या मेहनतीने पिकविलेली भाताची पिके पावसाने आडवी केली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस या भागात पडत आहे. या पावसाने भातशेतीबरोबर शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या मळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने आडव्या केलेल्या भात पिकाची कणसे शेतात साचलेल्या पावसात पडल्यामुळे लवकर तयार होणारे पीक कुजण्याची शक्यता आहे. या पावसामुळे भातपिकावर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून काही शेतांमध्ये करपा रोगाचा, तर काही ठिकाणी निळा भुंगेरा किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे.
----------------------------
विविध संकटांचा सामना
चार महिने विविध संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी भाताचे चांगले पीक तयार केले होते. मात्र, परतीच्या पावसाने पुन्हा एकदा या भागात थैमान घातले असून शिवारातील उभे पीक जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने सरकारी मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.