विसर्जित मूर्तीची माती पुन्हा मूर्तिकारांकडे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जित मूर्तीची माती पुन्हा मूर्तिकारांकडे!
विसर्जित मूर्तीची माती पुन्हा मूर्तिकारांकडे!

विसर्जित मूर्तीची माती पुन्हा मूर्तिकारांकडे!

sakal_logo
By

वसंत जाधव, नवीन पनवेल
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. यासाठीच पर्यावरणाच्या संतुलनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना पुढे आली आहे. त्यानुसार शाडूच्या मातीच्या मूर्तींची निर्मिती करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. घरच्या पिंपात विसर्जन केलेल्या मूर्तीची माती पुन्हा मूर्तिकारांकडे सुपूर्द करून पनवेल वेस्ट वॉरियर्सने पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतला आहे.
पनवेल परिसरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना मागणी आहे. वास्तविक पाहता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विसर्जन करताना जलाशयाचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मूर्तींना वेगळ्या प्रकारचे रासायनिक रंग दिल्याने पाण्यामधील जलचरांचा मृत्यूही होतो. पर्यावरणाचा बिघडणारा समतोल थांबवण्यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी पर्यावरणवादी संघटना आणि व्यक्ती; तसेच प्रदूषण नियंत्रण महामंडळ सातत्याने जनजागृती करत आहेत. त्यामुळे शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याकडे कल वाढलेला आहे.
पनवेल परिसरातही अशा प्रकारे पर्यावरणपूरक बाप्पा अनेक घरांमध्ये विराजमान झाले होते. दीड, सात आणि दहा दिवसांच्या बाप्पाचे घरच्या घरीच विसर्जन करण्यात आले. शाडूची माती विरघळल्यानंतर पनवेल वॉरियर्सने ती जमा करून मूर्तिकारांकडे सुपूर्द केली. या माध्यमातून शून्य प्रदूषणाचा अभूतपूर्व उपक्रम खारघर, कामोठे, सुकापूर, पनवेल, नवीन पनवेल व करंजाडे येथे राबवला. यामध्ये प्राजक्ता शहा, घनश्याम पाटील, गौरी काशीकर, प्रल्हाद बोडके, तनय दीक्षित, विनोद शिंगण व वृषाली म्हात्रे यांनी कृतीतून जनजागृतीची मुहूर्तमेढ रोवली. मूर्तिकारांचा आर्थिक फायदा, पर्यावरण संरक्षण व मूर्तीच्या मातीतून परत देवाच्या मूर्ती घडून पवित्र व आध्यात्मिक लाभ अशी त्रिसूत्री असलेला कार्यक्रम गणेश शिंदे, प्रतीक्षा महाडिक, राजीव अधिकारी व तुषार लेले यांनी भक्तिभावाने पार पाडला

पीओपीमुळे होणारे नुकसान
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात लवकर न विरघळल्याने, मूर्तीचे अवयव भंगतात. त्याचे तुकडे नैसर्गिक प्रवाहात अडथळे आणून पाणी साचून राहते. त्याचबरोबर जलस्रोतांची गढूळता, उष्णता व क्षारता वाढते. पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो. प्रकाश कमी मिळाल्याने प्रकाश संश्‍लेषणात अडथळे येतात. मूर्तीच्या सिंथेटिक रंगातील जड व विषारी धातू पाणवनस्पती व माशांमधून अन्नसाखळीत प्रवेश करतात. विसर्जनानंतर कृत्रिम तलावातून काढलेले डेब्रिज हेदेखील प्रचंड मृदा प्रदूषण करते.

पनवेल वेस्ट वॉरियर्सनी या परिस्थितीचा अभ्यास केला. काळाची गरज ओळखून घरच्याघरी मूर्ती विसर्जनानंतर राहिलेली मातीत मूर्तिकारांना भेट देऊन अनेक दुष्परिणाम थांबवण्याचा पायंडा पाडला. सार्वजनिक ठिकाणी गर्दी व वाहतूक कोंडी न करता, शून्य डेब्रिज, शून्य प्रदूषण व शून्य खर्चाचा हा उपक्रम लवकरच सर्वत्र करण्याचा मानस आहे.
- प्राजक्ता शाह, पनवेल वेस्ट वॉरियर्स