सुराज्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुराज्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना
सुराज्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना

सुराज्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना

sakal_logo
By

कामोठे, ता. ९ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेले सुराज्य पुनर्स्थापित करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली असून सरकारदरबारी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना दबावगट म्हणून कार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केले. पनवेल येथील शाखेच्या उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यभर स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत ‘गाव तिथे शाखा, घर तिथे स्वराज्य’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत छत्रपती संभाजी राजे तीन दिवसांच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून या अभियानाची सुरुवात झाली. या वेळी पनवेल एसटी स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नवीन पनवेल येथे जिल्ह्यातील पहिल्या स्वराज्य शाखेचे उद्‍घाटन करण्यात आले. याशिवाय पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठेसह पेण, खालापूर तालुक्यातील १०० स्वराज्य शाखांचे उद्‍घाटनही या दौऱ्यात केले जाणार आहे. या वेळी स्वराज्य संघटनेचे निमंत्रक विनोद साबळे, गणेश कडू आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------
‘आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या’
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. यावर भाष्य करणे उचित नाही. मराठा समाज आरक्षण आंदोलनात राज्यातील शेकडो समाज बांधवांवर गुन्हे दाखल आहेत. सरकारने उचित कार्यवाही करणे अपेक्षित आहे. या आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत, असे मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले.