संगीतातून स्‍वातंत्र्यवीरांचे कार्य समाजापुढे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगीतातून स्‍वातंत्र्यवीरांचे कार्य समाजापुढे
संगीतातून स्‍वातंत्र्यवीरांचे कार्य समाजापुढे

संगीतातून स्‍वातंत्र्यवीरांचे कार्य समाजापुढे

sakal_logo
By

भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य आजही तरुण पिढीला, समाजाला फारसे माहिती नाही, त्याची माहिती होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जे महत्त्वाचे कार्य आहे ते संगीताच्या माध्यमातून पुढे येणे गरजेचे असल्‍याचे प्रतिपादन सावरकरांचे अभ्यासक सतीश भिडे यांनी केले.
शहरातील वाचन मंदिराच्या वतीने टिळक मंदिर सभागृहात शारदीय प्रबोधनमाला अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित संगीतमय गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी भिडे बोलत होते. मूळचे गिरगाव येथील असलेले सतीश जनार्दन भिडे यांनी सावरकरांच्या कार्यावर आधारित गीते सादर केली. या सर्व गाण्यांतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याचा एक वेगळा प्रयोग भिडे करीत आहेत. सावरकर यांचे प्रखर विचार घराघरांत पोहोचवण्याचा त्यांचा मनोदय आहे. स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांवर गोपाळ गोडसे यांनी गाणी लिहिलेली आहेत. ही गाणी भिडे यांनी सादर केली. त्यास तबला साथ मनीष कानिटकर यांनी दिली; तर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष सुधीर सिंगासणे, प्रज्ञा जोशी, स्वरांजली कुंटे यांनी ‘जयोस्तुते’ या गाण्याने केली; तर सांगता ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या गाण्याने झाली.
प्रसंगानुरूप गाणी सादर
सावरकर यांच्या जीवनातील बालपणी अष्टभूजा देवी पुढे केलेली प्रतिज्ञा, विदेशी कपड्यांची केलेली होळी, लंडन येथील वास्तव्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले कार्य, जातीयता नष्ट करण्यासाठी, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी सावरकरांनी केलेले प्रयत्न, काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान येथे भोगत असताना तेथील कैद्यांना संघटित करून करण्यात आलेले कार्य, मराठी भाषा समृद्ध करणे, भारतावर चीनने केलेले आक्रमण, १९६६ साली पाकिस्तानवर मिळवलेला विजय या सर्व कार्याची आठवण करून देणारी गाणी सतीश भिडे यांनी सादर करून रसिकांची दाद मिळविली.