सायबर फसवणुकीचे महाजाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर फसवणुकीचे महाजाल
सायबर फसवणुकीचे महाजाल

सायबर फसवणुकीचे महाजाल

sakal_logo
By

ठाणे, ता. ९ (वार्ताहर) : घरबसल्या पैसे कमवा, दोन दिवसांत पीएफ रिफंड, कमी व्याजात कर्ज, तर कधी तुमचे क्रेडिट, डेबीट कार्ड ब्लॉक झाले आहे, विजेचे बिल भरले नाही, अशा भूलथापा देत सर्वसामान्यांच्या बँक खात्यावर दरोडा टाकणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे महाजाल पसरले आहे. या दरोडेखोरांनी गेल्या आठ महिन्यांत २४९ ठाणेकरांना ऑनलाईन गंडा घातला असल्याची नोंद ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात झाली आहे. मात्र, सायबर सेलला आतापर्यंत केवळ ४२ गुन्ह्यांचीच उकल करण्यात यश आले आहे.
वर्तकनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्‍या भामट्याच्या चौकशीत एक रुपयाचा ऑनलाईन व्यवहार, ३० लाखांचा गंडा घालण्याचे तंत्र उघडकीस आले. सुब्रम्हण्यम रामकृष्ण अय्यर (३३) आरोपीने अहमदाबाद, बडोदा, विलासपूर, पणजी, पुणे, मुंबई, सुरत, भोपाल, इंदोर, हैद्रराबाद अशा शहरांत व्यावसायिकांना एक रुपयाचा व्‍यवहार करून तब्बल ३० लाखांचा गंडा घातल्याचे उघड झाले. ठाण्यातील ज्युपिटर येथील ब्लू स्टोन ज्वेलरीच्या दुकानात २८ जानेवारी रोजी खरेदी करून ९७ हजार ३३० हजारांचे ऑनलाईन पेमेंट केल्याचा मेसेज दुकानदाराला दाखविला आणि संशयावरून हा आरोपी गजाआड झाला. मात्र, मोबाईल आणि सोशल मीडियावर येणारे मेसेज, विविध लिंक ओपन करताच किंवा माहिती भरताच चक्क क्षणातच बँक खाती रिकामी होण्याच्या रोज शेकडो घटना जिल्‍ह्यात घडत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून फसवणुकीचे हे महाजाल सर्वत्र पसरले आहे. मात्र, लॉकडाऊन काळात सायबर गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रोज कुठे ना कुठे, कुणी तरी या ठगांना बळी पडत असताना त्या तुलनेत मात्र पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद होण्याचे प्रमाण कमी आहे. जे गुन्हे दाखल होतात ते नंतर पोलिसांच्या सायबर सेलकडे वर्ग केले जातात. जानेवारी २०२२ ते ३१ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत १,७०५ प्रकरणे मदतीसाठी सायबर सेलकडे आली. त्यापैकी १२५७ प्रकरणे ही निकाली काढण्यात आली; तर उर्वरित ४४८ प्रकरणे ही अद्याप प्रलंबित असल्‍याची माहिती सायबर सेल विभागाच्या पोलिस निरीक्षक नीलम वावळ यांनी दिली.

लुटलेला मुद्देमाल वसूल करणे आव्हान
२०१९ आणि २०२० या वर्षात विविध सायबर गुन्ह्यात ६९ फसवणूक झालेल्या लोकांना आरोपींनी लांबविलेली एक कोटी ८३ लाख पाच हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे; तर २०२१ या वर्षात ऑनलाईन फसवणूक झालेल्या १७० तक्रारदारांना २६ लाख ४६ हजार ४६५ रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात आलेली आहे. २०२२ या वर्षात जानेवारी ते ३१ ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत फसवणूक झालेल्या ४१ तक्रारदारांचे २४ लाख ७७ हजार ५५९ रुपये त्यांना परत मिळवून देण्यात आले. मात्र, लुटल्या गेलेल्या रकमेच्या तुलनेत वसुली तोकडी असल्याने सायबर सेलसमोर मोठे आव्हान आहे.


फसवणुकीचा प्रकार २०२१ २०२२
( जानेवारी ते ऑगस्ट).

डेबीट कार्ड ----------------------------------- ३३ ------- ३२
मेट्रोमोनियल ---------------------------------- ८ -------- १
सोशल मीडिया ------------------------------- २९ -------- ६२
नोकरी/लॉटरी --------------------------------- ८ -------- २८
कर्ज -------------------------------------- ११ -------- १७
इतर ----------------------------------------- १५८ ------१०९
एकूण २४७ २४९
-----------------------------------------------------
सज्ञान व्हा, सतर्क राहा
नागरिकांनी जागरूक राहावे, सतर्क राहावे, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका, कुणीही फुकट काहीच देत नाही, कुठलेही ॲप्स डाऊनलोड करू नका, बँकेची कुठलीही माहिती त्रयस्‍थ व्यक्तीला सांगू नका. ओटीपी कुणालाही शेअर करू नका. बँक ग्राहकाला बँकेची माहिती विचारत नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने पाठवलेली लिंक उघडू नका.
- नीलम वावळ, पोलिस निरीक्षक, सायबर सेल