प्लास्टिक मुक्तीसाठी क्लॉथ व्हेंडिंगचा पर्याय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक मुक्तीसाठी क्लॉथ व्हेंडिंगचा पर्याय
प्लास्टिक मुक्तीसाठी क्लॉथ व्हेंडिंगचा पर्याय

प्लास्टिक मुक्तीसाठी क्लॉथ व्हेंडिंगचा पर्याय

sakal_logo
By

खारघर, ता.९ (बातमीदार): प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम होत आहेत. मात्र, दैनंदिन जीवनात नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याने कापडी पिशवी बनवणाऱ्या एक ऑटोमॅटिक क्लॉथ व्हेंडिंग मशिनची निर्मिती खारघरमधील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक आणि टेलिकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना मार्केटमध्ये भाजीवाले, फळवाल्यांकडे, किराणा दुकानात या पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणारी पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कापडी पिशवी निर्मितीची मशीन विकसित केली आहे. सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रानिक आणि टेलिकम्युनिकेशन शाखेच्या प्रमुख शीतल बुक्कावार आणि प्राचार्य मंजुषा देशमुख यांच्या प्रोत्साहनातून आठ विद्यार्थ्यांच्या मदतीने या स्वयंचलित व्हेंडिंग मशिनची निर्मिती केली आहे.
-------------------------------------
राज्यातील पहिलेच मशीन
निर्मिती केलेली मशीन हलकी असून तीन फूट एवढी आहे. या मशीनमध्ये दहा रुपये किंवा पाच रुपयांचे दोन नाणी टाकल्यास मशीनमधून एक कापडी पिशवी बाहेर येते. या प्रकल्पाला खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनने आर्थिक सहाय्य दिले असून राज्यातील हे पहिले स्वयंचलित व्हेंडिंग मशीन असल्याचा दावा केला जात आहे.
-----------------------------------------------
क्लॉथ व्हेंडिंग मशिनच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांची मेहनत, प्राचार्या मंजुषा देशमुख यांचे मार्गदर्शन आणि खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनचे सहकार्य खूप मोलाचे आहे.
-शीतल बुक्कावार, प्रमुख, इलेक्ट्रानिक आणि टेलिकम्युनिकेशन विभाग, सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय