खदानीत बुडून दोघा मुलांचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खदानीत बुडून दोघा मुलांचा मृत्यु
खदानीत बुडून दोघा मुलांचा मृत्यु

खदानीत बुडून दोघा मुलांचा मृत्यु

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ९ ः भोपर येथील खदानीवर पोहायला गेलेल्या सहा जणांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असलेल्या तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले, परंतु दोघांना पाण्याच्या बाहेर काढता आले नाही. या घटनेत आयुष केदारे (वय १२) आणि आयुष गुप्ता (वय १३) या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

डोंबिवली पूर्वेतील ज्योतीनगर झोपडपट्टी परिसरात राहणारे आयुष केदारे, आयुष गुप्ता, कीर्तन म्हात्रे, पवन चव्हाण, परमेश्वर घोडके, आणि अतुल अवटे ही सहा अल्पवयीन मुले रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोपर येथे फिरण्यासाठी गेली होती. भोपर येथील गावदेवी मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी खदानीच्या पाण्यात पोहण्यास जाण्याचा निर्णय केला. त्यानंतर आयुष केदारे, आयुष गुप्ता आणि परमेश्वर हे तिघे खोल पाण्यात उतरले; तर अतुल, कीर्तन आणि पवन हे कमी पाणी असलेल्या ठिकाणी पोहत होते. खदानीतील पाण्याचा अंदाज खोल गेलेल्या तिघांना आला नाही, तसेच खदानीच्या पाण्यातील चिखलात आयुष केदारे, आयुष गुप्ता हे रुतू लागले. याची जाणीव होताच या तिघांनीही आरडाओरडा सुरू केली. यावेळी इतर तिघा मित्रांनी जवळच असलेल्या परमेश्वरला बाहेर काढले; परंतु त्यांना आयुष केदारे व आयुष गुप्ता यांना वाचवता येत नसल्याने त्यांनी आरडाओरडा केली. त्यांचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी खदानीजवळ धाव घेतली. तसेच पलावा अग्निशमन दल आणि मानपाडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलांचा शोध सुरू केला. अर्धा- एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पलावा अग्मिशमन दलाचे उपस्थानक अधिकारी सुधीर दुसिंग यांनी सांगितले. या प्रकरणाची मानपाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून दोघांचे मृतदेह शास्त्रीनगर रुग्णालय येथे हलवले आहेत. या घटनेमुळे आयरे गावात शोककळा पसरली आहे.


यापूर्वीही खदानीत पाच जणांचा मृत्यू
------------------------------------------
पाच महिन्यांपूर्वी संदप येथील खदानीत पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर खदानीवर कोणत्याही नागरिकाचा जीव जाऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने खदानींच्या बाहेर अग्निशमन दलाच्या साह्याने जीवरक्षक नेमण्यात येणार होता; परंतु अग्मिशमन विभागाकडेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हा निर्णय केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे दिसते. अद्यापही त्याची अंमलबजावणी न झाल्याने आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे.