महात्मा गांधी एक विचारधारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधी एक विचारधारा
महात्मा गांधी एक विचारधारा

महात्मा गांधी एक विचारधारा

sakal_logo
By

कासा, ता. ९ (बातमीदार) : महात्मा गांधी एक विचारधारा आहे. महात्मा गांधींचे अनुयायी संपूर्ण विश्वात आहेत. अनेक देशांनी गांधीजींच्या अहिंसेचा मार्ग स्वीकारून आपल्या देशाला प्रगत करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधींचे अहिंसेचे शस्त्र व खादीचे वस्त्र यांसारख्या ग्रामोद्योगी विचारांमधून गावाचा विकास पंचायतराज व्यवस्थेतूनच शक्य होईल. गांधी विचार कधीही नाहीसे होऊ शकत नाहीत. उलट त्यांना नवे आयाम लाभून अधिक प्रगल्भ होत जातील. कारण हे विचार मानवतेचे, विश्व कल्याणाचे आहेत, असे प्रतिपादन प्रा. डॉ. बसवेश्वर पाडांगळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दल पालघर जिल्हा व कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त ‘पंचायतराज व्यवस्था’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पाडांगळे बोलत होते.
प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी सर्वप्रथम कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्या सामाजिक समतेच्या महान कार्याचे कौतुक करून स्मृतीस विनम्र अभिवादन केले. ते म्हणाले, ‘‘पंचायत राज व्यवस्था ही गावाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे; मात्र ही व्यवस्था आज व्यवस्थित राबवली जात नाही. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी खेडी सुधारली नाहीत हे आपले दुर्दैव आहे. विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात लक्ष घातले पाहिजे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामसभेत सहभागी झाले पाहिजे. गावात शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते या व्यवस्था परिपूर्ण असल्या पाहिजेत. यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे.’’
याप्रसंगी पंचायतराज व्यवस्था या व्यवस्थेचे जनक आणि अंमलबजावणी यावर प्राध्यापक गोतीस यांनी विचार मांडले. ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती पंचायतराज व्यवस्थेसाठी किती महत्त्वाची आहे, हेदेखील सांगितले.