दिवाळी फराळाला महागाईचा खमंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी फराळाला महागाईचा खमंग
दिवाळी फराळाला महागाईचा खमंग

दिवाळी फराळाला महागाईचा खमंग

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १२ (बातमीदार) : कोरोनानंतर सर्वच सण-उत्सव धडाक्यात साजरे झाले होत असताना सर्वात मोठ्या दिवाळी सणाच्या उत्साहावर महागाईने वक्रदृष्टी टाकली आहे. विशेषतः खुसखुशीत, चमचमीत, खमंग फराळाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. मैदा, रवा, साखर, गूळ, पोहे, तेल, बेसन आदी सर्वच जिन्नसांचे भाव वाढले आहेत. अवघ्या दहा-बारा दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली असतानाही फराळासाठी लागणारा किराणा विकत घेण्याची लगबग म्‍हणावी तशी अद्याप सुरू झालेली नाही.

दिवाळी म्हणजे चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळ्या, लाडू, फराळ असे समीकरणच झाले आहे. म्हणूनच दिवाळी जवळ आली की घरोघरी डाळी भाजणीपासून ते तळण्याच्या पदार्थांचा खमंग दरवळायला लागतो, पण यंदा हा खमंग महागाईच्या फोडणीमुळे हरवल्यासारखा झाला आहे. इंधन दरवाढ, खाद्यतेलाचे भाव भडकले असतानाच आता फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांनीही भाव खाल्ल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोहे, सुके खोबरे, गूळ, रवा, मैदा, साखर इत्यादी किराणा खरेदी करताना सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागणार आहे. पण या खरेदीलाही अजून सुरुवात झाली नसल्याचे किराणा व्यापाऱ्यांनी सांगितले.

खरेदीला फटका
बहुतेक नोकरदारांचा पगार दहा ते पंधरा तारखेपर्यंत होतो. त्यामुळे महिन्याच्या घरातील किराणासोबतच दिवाळीच्या जिन्नसाचीही खरेदी होण्याची शक्यता आहे. त्यात पावसाच्‍या अधूनमधून सरी येत असल्यामुळेही खरेदीला मोठा फटका बसत असल्याचे किराणा व्यापारी भवन सिंग यांनी सांगितले.

दिवाळं काढणारी दिवाळी
महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून सण साजरा करायचा की घर चालवायचे, असा प्रश्न सर्वसामान्य गृहिणींना पडला आहे, असे दीपाली भगत यांनी सांगितले.

पूर्वी मोठमोठे डबे भरून फराळ बनवला जायचा. शेजारी-नातेवाईकांना वाटला जायचा. पण आता परवडत नसल्याने घरच्यांपुरती शास्त्र म्हणून फराळ बनवण्यात धन्यता मानावी लागत असल्याचे नोकरदार अश्विनी जाधव यांनी सांगितले.


सुके खोबरे
पावसाळ्यामध्ये सुक्‍या खोबऱ्याला बुरशी लागत असल्याने ते सुके खोबरे फार वेळ टिकत नाही, त्यामुळे सुक्या खोबऱ्याची किंमत वाढली आहे. दिवाळीच्या फराळासाठी राजापुरी खोबऱ्याचा वापर केला जातो. होलसेल बाजारात २४० तर किरकोळ बाजारामध्ये २७० रुपये खोबऱ्याची किंमत आहे.

पोहे
पोह्यांमध्ये पातळ पोहे व जाड पोहे असे दोन प्रकार आहेत. चिवड्यासाठी या दोन्ही पोह्यांचा वापर केला जातो. यापूर्वी होलसेल बाजारात पोह्याचे दर हे ४० रुपये, तर किरकोळ बाजारांमध्ये ४३ रुपये होते; परंतु या पोह्यांचा दर आता ४६ रुपये ते ५५ रुपये इतका दर झालेला आहे.

गूळ
सणासुदीच्या काळात गुळाचे दर पाच रुपयांनी वाढलेले आहेत. गुळाचा कच्चा माल खराब झाल्याने त्याचा परिणाम गुळाच्या दरवाढीवर झाला आहे. सेंद्रिय गुळाचा दर हा बाजारात ५५ ते ६० रुपये आहे, तर होलसेल बाजारात गूळ ४६ रुपये दराने मिळत आहे.

मैदा व रवा
रवा होलसेल बाजारात ४० रुपये, तर किरकोळ बाजारात ४२ रुपये आहे. मैदा हा किरकोळ बाजारात ४३ तर होलसेल बाजारात ४७ रुपयांत मिळत असल्याचे विक्रेते भवन सिंग यांनी सांगितले.