दररोज लागणार्या औषधांवर लक्ष देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दररोज लागणार्या औषधांवर लक्ष देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
दररोज लागणार्या औषधांवर लक्ष देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

दररोज लागणार्या औषधांवर लक्ष देण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

sakal_logo
By

जे. जे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा
देखरेखीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पालिकेच्या रुग्णालयांनंतर राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयातही औषधांचा तुटवडा जाणवत आहे. पॅरासिटामॉल, ॲझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन, डायक्लोफेनॅक सोडियम, अस्थॅलिन, सेट्रिझिन, अझी इत्यादींसारखी काही औषधे मिळत नसल्याचे समोर येत आहे. दरम्यान, दररोज आवश्यक असलेल्या अत्यावश्यक औषधांच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

समिती स्थापन करण्यात आल्यानंतरही काही महिन्यांपासून जे. जे. रुग्णालय मोठ्या प्रमाणात औषधटंचाईने त्रस्त असल्‍याचे समोर आले आहे. उपचारांसाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना औषध तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्राथमिक औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना बाहेरून ती घेण्याशिवाय पर्याय नाही.

जे. जे. रुग्णालयात दररोज जवळपास चार हजार रुग्ण ओपीडीमध्ये येतात. शेकडो रुग्ण दाखल होतात. रुग्णालयात येणारे बहुतेक रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना उपचार परवडत नाहीत. रुग्णालयाचा साठा संपल्याने त्यांना औषधे बाहेरून खरेदी करावी लागतात. दातदुखी, ताप, खोकला आणि ॲलर्जीसारख्या सामान्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही प्राथमिक औषध मिळत नाही.

ऑक्सिटोसिन इंजेक्शन शस्त्रक्रिया विभागात प्रसूतीदरम्यान वापरले जाते. एका आठवड्यात सुमारे एक हजार कुप्या लागतात; पण आमच्याकडे मर्यादित साठा आहे. रुग्णालय त्यांच्या स्तरावर खरेदी करत आहे. आम्ही सीएसआरद्वारे देणगी देण्यास विनंती करत आहोत, असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

दररोज औषध साठा तपासणार!
जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, आम्ही आमच्या पातळीवर औषधांची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. व्यवस्थापनाने महिन्याचा औषध साठा तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. तुटवड्यावर मात करण्यासाठी १० टक्के औषधांचा साठा स्थानिक पातळीवर खरेदी केला आहे.
औषधांचा सध्याचा साठा तपासण्यासाठी टीमसोबत बैठक घेणार आहे. अत्यावश्यक औषधांची गरज असलेल्या रुग्णांना रुग्णालयातच ती मिळावीत म्हणून मी स्वत: दररोज साठा तपासणार आहे, असेही त्यांनी सांगितले.