उपजिल्‍हा रुग्‍णालय समस्‍यांच्या गर्तेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपजिल्‍हा रुग्‍णालय समस्‍यांच्या गर्तेत
उपजिल्‍हा रुग्‍णालय समस्‍यांच्या गर्तेत

उपजिल्‍हा रुग्‍णालय समस्‍यांच्या गर्तेत

sakal_logo
By

राजेश कांबळे ः सकाळ वृत्तसेवा
पेण, ता. १२ : तालुक्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आदिवासी दुर्गम भागही मोठ्या प्रमाणात आहे. येथील नागरिकांना पेण उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार आहे. दिवसाला शेकडो रुग्‍ण याठिकाणी उपचारासाठी येतात, मात्र रुग्‍णालयातील अनेक पदे रिक्‍त असल्‍याने रुग्‍णांची हेळसांड होते. त्‍याबरोबरच परिसरात अस्‍वच्छता पसरल्‍याने दुर्गंधी, कचऱ्‍‌याचे साम्राज्‍य पसरले असून नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.
उपजिल्हा रुग्णालयात जवळपास ३५ खोल्या आणि दोन वार्ड आहेत. रुग्‍णालय परिसर मोठा असून सध्या केवळ एकच सफाई कर्मचाऱ्‍‌याची जागा भरली आहे; तर कंत्राटी पद्धतीत तीन कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी दोन सफाई कामगार आहेत. रुग्‍णालयाचा आवाका, रुग्‍णांची रोजची वर्दळ, आजूबाजूचा परिसर पाहता दोनच सफाई कर्मचारी कार्यरत असल्‍याने स्‍वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयातील अंतर्गत साफसफाई होत असली तरी आवारासह आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्‍य पसरले आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाची साफसफाई दररोज होणे गरजेचे असून याकडे शासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी याठिकाणी उपचारासाठी येणाऱ्‍‌या रुग्णांकडून करण्यात येत आहे.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात कक्ष सेवक म्‍हणून ५ पदे मंजूर आहेत, त्‍यापैकी एक पद रिक्‍त आहे. सफाई कामगाराचे एक पद रिक्‍त आहे. शस्‍त्रक्रिया विभागातील परीक्षकाचे एक पद रिक्‍त आहे; तर बाह्य रुग्णसेवक म्‍हणून २००९ ला मंजूर झालेले पद अद्याप भरण्यात आलेले नाही. जवळपास १३ वर्षे होत आली तरी पद रिक्‍त असल्‍याने आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार उघड होत आहे. शासनाने पेण उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी रुग्‍णांसह सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे.

दिवसाला शेकडो रुग्‍णांवर उपचार
पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुरुष, महिलांसाठी स्‍वतंत्र वार्ड, प्रसूती विभाग, आयपीडी, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, आयसीटीसी विभाग, औषध विभाग, आयुष कक्ष, आरबीएसके १-२, आश्रम शाळा वैद्यकीय पथक, दंत चिकित्‍सा कक्ष, नेत्र चिकित्‍सा कक्ष, टीबी विभाग, इंजेक्शन विभाग असे विभाग असून रुग्णालयात दिवसाला साधारणपणे २५० ते ३०० रुग्णांची तपासणी केली जाते. यात शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातून १०० ते १५० नागरिक उपचारांसाठी येतात.

पेण उपजिल्हा रुग्णालयात पाच-सहा वर्षांपूर्वी क्षितिज बेरोजगार संस्था या नावाने ठेका होता. यामध्ये पाच कर्मचारी काम करत होते. दररोज दोन-तीन वेळा साफसफाई व्हायची. मात्र आता काम वाढले आहे, तुलनेने मनुष्‍यबळ कमी असल्‍याने
रुग्णालयासह परिसरात स्वच्छतेचा अभाव जाणवतो.
- भरत साळवी, संचालक, क्षितिज बेरोजगार संस्था

पेण उपजिल्हा रुग्णालयात काही पदे रिक्त आहेत, याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरच ती पदे भरण्यात येतील. रुग्णालयाच्या अंतर्गत नेहमीच स्वच्छता होते, मात्र मनुष्‍यबळाअभावी रुग्‍णालय परिसरात कचऱ्‍‌याचे ढीग साचलेले दिसतात. नगरपालिकेचे दोन सफाई कर्मचारी रुग्णालयासाठी मिळावेत, याकरिता नगरपालिका मुख्याधिकाऱ्‍‌यांकडे पत्राद्वारे मागणी करणार आहोत.
- पांडुरंग गाडे, सहायक अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पेण