घणसोलीतील क्रीडा संकुलाच्या लढ्याला बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीतील क्रीडा संकुलाच्या लढ्याला बळ
घणसोलीतील क्रीडा संकुलाच्या लढ्याला बळ

घणसोलीतील क्रीडा संकुलाच्या लढ्याला बळ

sakal_logo
By

तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : घणसोलीमधील प्रस्तावित अशा अत्याधुनिक स्वरूपाच्या क्रीडा संकुलाचा आरक्षित भूखंड इतरत्र हलवू नये, याकरिता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या नवी मुंबई सेंटरच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने या भूखंडावर कोणतेही बांधकाम करण्यास ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
घणसोली सेक्टर १३ मधील भूखंड क्रमांक १ मधील १,४५,४५२.९६ चौ.मी. भूखंडावर नवी मुंबई महापालिकेच्या स्पोर्टस् कॉम्प्लेक्सऐवजी विभागीय क्रीडा संकुल विकसित करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली होती; मात्र १६० कोटींचा हा भूखंड निव्वळ ६६ कोटींमध्ये सिडकोच्या माध्यमातून खासगी बांधकाम व्यावसायिकाला दिला गेलेला होता. याशिवाय या आरक्षित भूखंडावर बांधकामदेखील सुरू करण्यात आले होते. त्यामुळे या भूखंडावरील क्रीडा संकुल इतरत्र हलवण्याची वेळ आली होती. याविरोधात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या नवी मुंबई सेंटरच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने या जागेवर कोणतेही काम करण्यास मनाई केली. ३० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन स्थगिती दिली आहे. त्यामुळे शासकीय क्रीडा संकुल वाचवण्याच्या लढ्याला उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे बळ मिळाले आहे.
----------------------------------------
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा
या भूखंडावर महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिंम्पिक साईज तरणतलाव तसेच ट्रॅक अँड फिल्ड, इनडोअर, हॉकी, कबड्डी व खो-खो स्टेडियम व सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील युवक-युवतींना संपूर्ण सुविधायुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलाचा वापर करता येणार आहे.
--------------------------------------------
कोट
सध्या तात्पुरती स्थगिती मिळालेली असून लढाई पूर्णपणे जिंकलेलो नाही. त्यामुळे नवी मुंबईकरांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या चळवळीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
- नीलेश पाटील, अध्यक्ष, आगरी-कोळी यूथ फाऊंडेशन