घणसोलीकरांचा श्वास डांबरामुळे बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीकरांचा श्वास डांबरामुळे बंद
घणसोलीकरांचा श्वास डांबरामुळे बंद

घणसोलीकरांचा श्वास डांबरामुळे बंद

sakal_logo
By

तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : तुर्भे स्टोअर परिसरातील जिल्हा परिषदेच्या गोडाऊनमध्ये महिन्याभरापासून डांबर निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पसरणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकांना मळमळणे, उलट्या होणे, डोके-छातीत दुखणे, खोकला याशिवाय श्वसनाचा त्रास होत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तुर्भे स्टोअर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डांबराचा उग्र वास येत आहे. या परिसरातील जिल्हा परिषदेच्या गोडाऊनमध्ये डांबर तयार करण्यात येत आहे. यासाठी होणाऱ्या प्रक्रियेमुळे परिसरात उग्र वास पसरला असून अनेकांना श्वसनाचे विविध त्रास होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या या गोडाऊनमध्ये फक्त सामान ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असताना डांबर निर्मिती प्रकल्प सुरू केला गेल्यामुळे हा प्रकल्प त्वरित बंद करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
--------------------------------------------
बोनसरीतील घटनेच्या पुनरावृत्तीची भीती
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये बोनसरीमध्ये जीएल कंपनीच्या डांबर प्लांटच्या टाक्यांमध्ये स्फोट होऊन झोपड्यांना भीषण आग लागल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. तसेच आगीमुळे दोन हजारांहून अधिक रहिवाशांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले होते. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती घणसोलीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------------------------------
नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेला बेकायदा डांबर निर्मिती प्रकल्प त्वरित बंद करावा, अन्यथा याला मूक परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला डांबर फासण्यात येईल.
- संतोष जाधव, रहिवासी, तुर्भे
-----------------------------------------
डांबर निर्मिती प्रकल्प कसा सुरू झाला याबाबत माहिती घ्यावी लागेल. तसेच दोन दिवसांत हा प्रकल्प हटवण्याबाबतची कारवाई केली जाईल.
- संदीप चव्हाण, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद