ट्रान्स हार्बरवर प्रवाशांचा ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रान्स हार्बरवर प्रवाशांचा ताण
ट्रान्स हार्बरवर प्रवाशांचा ताण

ट्रान्स हार्बरवर प्रवाशांचा ताण

sakal_logo
By

वाशी, ता. १२ (बातमीदार) ः ठाणे-वाशी, ठाणे-पनवेल, उरण- खारकोपर अशा ट्रान्स हार्बर मार्गावर नवी मुंबईसाठी विस्तारित सेवा सुरू झाल्या असल्या, तरीही वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत ही सेवा तोकडी पडत आहे. परिणामी, महिलांचा प्रवास अधिकच जिकीरीचा झाला असून गत आठवड्यात पनवेल-ठाणे मार्गावरील लोकलमध्ये महिलांमधील जागेवरून हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी या मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.
पनेवल परिसरात कळंबोली ते पळस्पेपर्यंत लोकवस्ती वाढू लागली आहे. या सर्वांना मुंबई व ठाणे परिसरात जाण्यासाठी रेल्वे हा मार्ग किफायतशीर असल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानके हा चांगला पर्याय आहे. अशातच सिडकोने बांधलेली प्रशस्त फलाट दोन्ही बाजूंना जिने आणि स्थानकाबाहेर पडण्यासाठी सुटसुटीत मार्गामुळे नवी मुंबईतील हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानके वेगळी ठरली आहेत. मात्र स्थानके जरी सुरक्षित असली तरी रेल्वेच्या डब्यांमधील परिस्थिती बदललेली नाही. अशातच हार्बर मार्गालगत नवी मुंबई शहराचा होणारा विकास पाहता वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे आता रेल्वे वाहतुकीवरही ताण वाढत चालला आहे; पण एकीकडे प्रवासी वाढत असले तरी दुसरीकडे रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढलेली नसल्यामुळे प्रवाशांमधील वादही वाढू लागले आहेत.
----------------------------------
वादावादीची मुख्य कारणे ः
- हार्बर मार्गावरील रेल्वेच्या डब्यात अनेकदा चौथ्या सीटवर बसण्यासाठी जागा दिली जात नसल्याच्या तक्रारी अनेक जण करतात. त्यातून वाद उद्भवतात. पूर्वी सकाळ-संध्याकाळी रेल्वेच्या डब्यात तुरळक गर्दी होत असे. मात्र आता सकाळ-संध्याकाळच्या डब्यात अनेकदा प्रवाशांना लटकत प्रवास करावा लागतो.
--------------------------------------------
-नेरूळ ते खारकोपर आणि खारकोपर ते बेलापूर या दोन मार्गांवर नेरूळ-उरण रेल्वे धावते. नेरूळ-खारकोपर मार्गावर दिवसाला केवळ ४४ फेऱ्या होतात. प्रत्येक फेरीमध्ये पाऊण ते एका तासाचे अंतर आहे. अशा परिस्थितीत रेल्वेमध्ये कसा प्रवेश करायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. त्यामुळे रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------------
ठाणे-वाशी-नेरूळ मार्गावर वाशी ते पनवेल या मार्गापेक्षा गर्दी कमी असायची, मात्र आता दोन्ही मार्गांवर तेवढीच गर्दी होत आहे. त्यासाठी रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे गरजेचे आहे. अनेकदा रेल्वेत बसायला जागा मिळत नाही. चौथ्या सीटवरही बसू दिले जात नाही. यावरून भांडणे होतात.
- प्रतिभा जाधव, प्रवासी