गावदेवी भाजी मंडईचे वाहनतळ बंदावस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावदेवी भाजी मंडईचे वाहनतळ बंदावस्थेत
गावदेवी भाजी मंडईचे वाहनतळ बंदावस्थेत

गावदेवी भाजी मंडईचे वाहनतळ बंदावस्थेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे रेल्वे परिसरातील दुचाकीच्या पार्किंगचा प्रश्न निकाली निघावा यासाठी गावदेवी भाजी मार्केटच्या बेसमेंटमध्ये दुचाकीसाठी वाहनतळ सुरू करण्यात आले होते; मात्र हे वाहनतळ मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद केल्याने वाहनतळाची सुविधा बंद आहे. त्यामुळे ठाणे स्टेशन परिसरात कामानिमित्त येणारे नागरिक आपली वाहने रस्त्याकडेला उभी करत असल्याने ठाणे रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ही पार्किंग व्यवस्था कधी सुरू होणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवासाकरिता बस आणि रिक्षा थांब्यांवर नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे अनेक प्रवासी घर ते स्थानकापर्यंतच्या प्रवासासाठी दुचाकीचा वापर करतात. या भागात वाहनतळाची पुरेशी सुविधा नसल्यामुळे नागरिक रस्त्याकडेला दुचाकी उभी करतात. या बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाने गावदेवी भाजी मंडई इमारतीच्या तळघरात दुचाकी वाहनतळाची उभारणी केली. २०० ते २५० दुचाकींच्या पार्किंग क्षमतेचे वाहनतळ सुरू करण्यात आले होते. दरवर्षी जागेच्या भाडेदरात १० टक्के वाढ करण्यात येत असल्याने ही दरवाढ परवडत नसल्यामुळे संबंधित ठेकेदाराने २०२० मध्ये वाहनतळाचे काम बंद केले. त्यानंतर दोन महिन्यांत कोरोनाचा काळ सुरू झाला. तेव्हापासून हे वाहनतळ बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या परिसरात बेकायदा दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे हे वाहनतळ पुन्हा खुले करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

चौकट
१० महिन्यांचा काळ उलटला तरीही...
पालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यात वाहनतळ खुले करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्याचाच एक भाग म्हणून हे वाहनतळ भाडे तत्त्वावर देण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. गावदेवी वाहनतळ यापूर्वी रिटा मार्केटिंग कंपनीला भाडे तत्त्वावर देण्यात आले होते. त्यात या कंपनीला तीन वर्षांच्या कालावधीकरिता वाहनतळ भाडे तत्त्वावर देण्यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली; मात्र १० महिन्यांचा काळ उलटूनही हे वाहनतळ अद्याप सुरू झाले नसल्याची बाब समोर आली.