...अन् मुख्यमंत्री उत्तनला आलेच नाहीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् मुख्यमंत्री उत्तनला आलेच नाहीत
...अन् मुख्यमंत्री उत्तनला आलेच नाहीत

...अन् मुख्यमंत्री उत्तनला आलेच नाहीत

sakal_logo
By

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमात उत्तन चौक येथील नरवीर चिमाजी आप्पांच्या पुतळ्याच्या अनावरणाचाही समावेश होता. आधी ठरल्यानुसार मुख्यमंत्री प्रत्यक्ष चिमाजी आप्पा स्मारकाला भेट देऊन पुतळ्याचे अनावरण करणार होते. मात्र आयत्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांची स्मारकाची भेट रद्द करण्यात येऊन पुतळ्याचे ऑनलाईन अनावरण करण्यात आले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आणि आपल्या समस्या त्यांच्या कानावर घालण्यासाठी वाट पाहाणाऱ्‍या मच्छीमार समाजाचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी नाट्यगृहाच्या लोकार्पणासह विविध विकासकामांचे उद्‌घाटन पार पडले. या कार्यक्रमात चौक येथील चिमाजी आप्पा स्मारकात बसविण्यात आलेल्या अश्वारूढ नरवीर चिमाजी आप्पांच्या पुतळ्याचे अनावरणही समाविष्ट होते. मुख्यमंत्री उत्तनमध्ये जाणार असल्याने प्रशासनाने या मार्गावरील रस्तेदेखील तातडीने दुरुस्त करून घेतले होते. मात्र आयत्यावेळेस मुख्यमंत्री उत्तनमध्ये येणार नसल्याचा संदेश मच्छीमारांना मिळाला. उत्तनमधील लहान रस्ते तसेच समुद्रकिनारा यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांचा चौक येथील दौरा रद्द करण्यात आला. याची माहिती मच्छीमारांना कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी मिळाली. मुख्यमंत्री येणार नसल्याचे कळल्यानंतर मच्छीमारांचा हिरमोड झाला.
.....
निवेदनही होते तयार
मच्छीमारदेखील मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तयार होते. अनेकांनी यादिवशी मासेमारीसाठी समुद्रात जायचे पुढे ढकलले. काही जणांनी तर खास मच्छीमारांची पारंपरिक वेशभूषा असलेली लाल रंगाची बंडी (डोक्यावरील विशिष्ट टोपी) मागवली होती. महत्त्वाचे म्हणजे मच्छीमारांना भेडसावणाऱ्‍या समस्यांबाबतचे मुख्यमंत्र्यांना द्यायचे निवेदनही तयार ठेवण्यात आले होते.
...
मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून आलेली वादळे, मासळीचा दुष्काळ या समस्यांसह, मच्छीमारांच्या डिझेलवरील अनुदान, परतावा, जेटी, नुकसानभरपाई आदी अनेक समस्यांचे निवेदन तयार करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मच्छीमारांच्या स्थितीची कल्पना द्यायची होती. या भेटीनंतर तरी मच्छीमारांना द्यायच्या नुकसानभरपाईबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी मच्छीमारांना अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री न आल्याने त्यांची निराशा झाली आहे.
- लिओ कोलासो, मच्छीमारांचे नेते