कायम बंद उद्यानात आसनव्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कायम बंद उद्यानात आसनव्यवस्था
कायम बंद उद्यानात आसनव्यवस्था

कायम बंद उद्यानात आसनव्यवस्था

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) ः देवनार मनपा वसाहतीतील नागरिकांसाठी कायम बंद असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड उद्यानात खुर्च्या बसवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातही एक खुर्ची त्या ठिकाणाहून नाहीशी झाली आहे. पालिकेने हा अनावश्यक खर्च करण्यामागचे कारण काय आणि नाहीशी झालेल्या खुर्चीविषयी पालिकेला माहिती आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांना पडत आहेत.
गोवंडीच्या देवनार पालिका वसाहतीत मुख्य चौकात एम पूर्व कार्यालयापासून जवळच कर्मवीर दादासाहेब गायकवाड उद्यान आहे. पालिकेच्या या उद्यानाची देखभाल उद्यान विभागाकडून करण्यात येते; मात्र याचे दरवाजे नागरिकांसाठी कायम बंद असतात. तरीदेखील या उद्यानात आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी महागड्या खुर्च्या असल्याचे दिसत आहे. जर या उद्यानात प्रवेशच नाही, तर मग या खुर्च्यांवर बसणार कोण? आणि नागरिकांनी कररूपाने अदा केलेल्या पैशातून हा अनावश्यक खर्च कशासाठी केला, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यातील एक खुर्ची नाहीशी झाली असल्याचे दिसत आहे. दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारे बंद असताना ही खुर्ची नाहीशी कशी झाली, याचा अंदाज बांधत त्याची कल्पना पालिकेला आहे की नाही, अशी शंकादेखील उपस्थित होत आहे.

ही आसने पालिकेकडून बसवण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्याविषयी माहिती उपलब्ध नाही. या उद्यानाला पूर्वी सुरक्षारक्षक नव्हता. आता त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आला आहे.
- अमित करंदीकर, अधिकारी, उद्यान विभाग एम पूर्व