फादरवाडी बहुउद्देशीय इमारतीत रुग्णालय उभा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फादरवाडी बहुउद्देशीय इमारतीत रुग्णालय उभा करा
फादरवाडी बहुउद्देशीय इमारतीत रुग्णालय उभा करा

फादरवाडी बहुउद्देशीय इमारतीत रुग्णालय उभा करा

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रामधील वार्ड क्रमांक ७७ मधील फादरवाडी येथे सध्या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या जागी फादरवाडीचे प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात होते. जे तोडण्यात आले. परिणामी फादरवाडी येथील नागरिकांची आरोग्यासंबंधी गैरसोय होत आहे. सध्या निर्माण होत असलेल्या इमारतीमध्ये महापालिकेने शासकीय रुग्णालयाची स्थापना करावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंग यांनी राज्य शासनाकडे आणि मनपा आयुक्तांकडे केली आहे.
नव्याने निर्माण होणाऱ्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये शासकीय रुग्णालय स्थापन केले, तर गोखिवरे व आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांना सदर रुग्णालयाचा लाभ घेता येऊ शकेल. या इमारतीमध्ये ग्रंथालय व वाचनालय निर्माण करण्याबाबत शिल्पा सिंग यांनी याआधी मागणी केली आहे.
त्यामुळे फादरवाडी येथे नव्याने बनत असलेल्या वसई-विरार शहर महापालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये शासकीय रुग्णालयाचे प्रयोजन करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वार्ड क्रमांक २८ (नवीन) च्या माजी नगरसेविका शिल्पा दिवाकर सिंग यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्याकडे केली आहे.

------
खाजगी दवाखाने खर्चिक
गोखिवरे, फादरवाडी, सातिवली, वालीव, भोईदापाडा, जानकी पाडा, रेंज ऑफिस, गोलाणी नाका, गावराई पाडा येथील स्थानिक रुग्णांना औषधोपचारासाठी खाजगी दवाखाने गाठावे लागतात. सध्याच्या आर्थिक मंदीमध्ये खासगी दवाखान्यांचा खर्च सामान्य नागरिकांना परवडणारा नाही. शासकीय रुग्णालयाअभावी येथील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.