मशाल आमचीच, समता पक्षाचा चिन्हावर दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशाल आमचीच, समता पक्षाचा चिन्हावर दावा
मशाल आमचीच, समता पक्षाचा चिन्हावर दावा

मशाल आमचीच, समता पक्षाचा चिन्हावर दावा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार; तर ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले आहे. या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गट सज्ज झाला असतानाच समता पक्षाने मशाल चिन्ह आमचे असून ते पुन्हा आम्हाला मिळावे असा ईमेल निवडणूक आयोगाला केला आहे. समता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश अरुण देवळेकर यांनी सांगितले, की याविषयी कोर्टात याचिका दाखल केली जाणार असून अंधेरी निवडणुकीत आमचा उमेदवारदेखील असेल.


दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून, यावर आज निर्णय अपेक्षित आहे. या वेळी समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर म्हणाले, की ‘जॉर्ज फर्नांडिस यांनी १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केल्यावर १९९६ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना मशाल हे चिन्ह दिले होते; मात्र सोमवारी निवडणूक आयोगाने काढलेल्या आदेशात २००४ मध्ये समता पार्टीची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंना त्यांचे धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केले आहे. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून या चिन्हावर आपला हक्क सांगितला आहे. आम्ही अंधेरीत तगडा उमेदवार निवडला आहे; मात्र एकाच चिन्हावर दोन उमेदवार असल्यास मतविभागणीची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतर पक्षाला देऊ नये, अशी मागणी केली आहे.


मतपत्रिकेत दोन्ही चिन्हे एकसारखीच दिसतील
-----------------------------------------------------
उद्धव ठाकरे यांची मशाल गोल आकारात भगव्या रंगात आहे. समता पार्टीची मशाल हिरव्या व पांढऱ्या रंगात आहे; मात्र निवडणूक मतदान पत्रिकेत किंवा मतदान यंत्रावर सफेद व काळ्या रंगात चिन्ह असते. यामुळे दोन्ही चिन्हे एकसमान दिसून मतदारांत संभ्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे गटाची बी टीम असल्याची चर्चा...
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची निवडणुकीत कोंडी करण्यासाठी शिंदे गटाने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. समता पार्टीचे देवळेकर यांची शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांच्याशी जवळीक असल्याची कल्याणमध्ये चर्चा आहे. भविष्यात समता पार्टी ही शिंदे गटाची बी टीम असेल, अशीदेखील चर्चा कल्याणमध्ये रंगली आहे.