उरण-नेरुळ रेल्वेला पुन्हा गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरण-नेरुळ रेल्वेला पुन्हा गती
उरण-नेरुळ रेल्वेला पुन्हा गती

उरण-नेरुळ रेल्वेला पुन्हा गती

sakal_logo
By

उरण, ता. १२ (वार्ताहर) ः नेरूळ ते उरण रेल्वेसाठी जासई येथील ३२ शेतकऱ्यांच्या सिडकोने २२ वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदल्यात साडेबारा टक्के भूखंड दिले नसल्याने शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम बंद केले होते. मात्र, मंगळवारी दुपारनंतर पोलिस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे उरण ते नेरूळ रेल्वे प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे.
खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जानेवारी २०२३ ला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या मार्गाच्या कामाने सध्या वेग धरला आहे. मात्र, सिडकोच्या धोरणामुळे जासई येथील काम बंद करण्यात आले होते. सुरुवातीला खारकोपर ते उरण हा १४.३ किलोमीटरच्या मार्गाचे काम भूसंपादन व वन विभागाच्या परवानगीमुळे रखडले होते. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे गव्हाण, जासई, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी व उरण या सहा स्थानकांच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण रेल्वे व सिडकोच्या भागीदारीतून उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पासाठी जासई येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने २२ वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने जासईमधील शेतकऱ्यांनी गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद केले होते. त्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते.
---------------------------------
शेतकऱ्यांची सिडकोकडून प्रतारणा
जासईमधील शेतकऱ्यांना सिडकोकडून वारंवार झालेल्या बैठकीतून पोलिस यंत्रणा व विविध आस्थापनांसमोर आश्वासने देऊन ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे हे काम बंद करण्यात आले होते. या संदर्भात ३० सप्टेंबर २०२२ ला सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना येत्या सहा महिन्यांत द्रोणागिरी नोड किंवा दुसऱ्या नोडमध्ये भूखंड देण्यात येतील, असे आश्वासन सिडकोकडून दिलेल्या पत्रात दिले आहे.
------------------------------------------------------
सिडकोने घेतलेली बैठक ही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता झाली आहे. पोलिसांनी बंदोबस्तात काम सुरू केले आहे. या बाबतीत पुढील दोन दिवसांत आम्ही निर्णय घेऊ.
-संतोष घरत, सरपंच, जासई ग्रामपंचायत
--------------------------------------
जासई येथे बंद करण्यात आलेले नेरूळ-उरण मार्गाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू केले आहे. शेतकऱ्यांविषयक विविध प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत.
- धनाजी क्षीरसागर, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोर्ट विभाग