गोदी कामगारांचा मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोदी कामगारांचा मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा
गोदी कामगारांचा मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

गोदी कामगारांचा मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

वडाळा, ता. १२ (बातमीदार) ः मुंबई पोर्टमधील गोदी कामगारांना मागील वेतन कराराची उर्वरित ८० टक्के थकबाकी, २०२१-२२ चा दिवाळीपूर्वी बोनस, प्रॉव्हिडंट फंडावर ४.५० टक्केपेक्षा अधिक व्याज या प्रमुख मागण्यांबाबत मुंबई पोर्ट प्राधिकरण व्यवस्थापनाने सन्माननीय तडजोड न केल्यास बंदर व गोदी कामगारांना आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी दिला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आज (ता. १२) माझगाव येथील कामगार सदनमध्ये झालेल्‍या गोदी कामगारांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
शेट्ये यांनी सांगितले की, मुंबई पोर्टमध्ये पूर्वी ४० हजार कामगार होते, आता चार हजार कामगार आहेत; तर ३६ हजार पेन्शनर्स आहेत. केंद्र सरकारच्या धोरणामुळे गोदीचे कामकाज खासगी पोर्टकडे जात आहे. वाढवण बंदराच्या विरोधात चालू असलेल्या मच्छीमारांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्‍याचे त्‍यांनी यावेळी नमूद केले. भारतातील प्रमुख बंदरांतील बंदर व गोदी कामगार आपल्या मागण्यांसाठी एकत्र येऊन लढतात, ही कामगार चळवळीतील एक जमेची बाजू आहे. गोदी कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य न केल्यास गोदी कामगारांना नाइलाजास्त आंदोलन करावे लागेल, असे शेट्ये आपल्या भाषणात म्हणाले.
या वेळी युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, युनियनचे पदाधिकारी डॉ. यतीन पटेल, विजय रणदिवे, विकास नलावडे, शशिकांत बनसोडे, निसार युनूस यांच्‍यासह समिती सदस्‍य व कामगार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.