वादळी वारे, पावसामुळे भातपिक आडवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वादळी वारे, पावसामुळे भातपिक आडवे
वादळी वारे, पावसामुळे भातपिक आडवे

वादळी वारे, पावसामुळे भातपिक आडवे

sakal_logo
By

वाडा, ता. १२ (बातमीदार) : वाडा तालुक्यात मंगळवारी (ता. ११) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसात कापणीस तयार होत असलेले उभे भातपीक आडवे झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचल्याने आडवे पडलेल्या भातपिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. भातपीक आडवे पडल्याने पाण्यात भाताचे दाणे व पेंढा काळे पडून खराब होण्याची भीती अधिक आहे. तसेच आडवे पडलेले भातपीक कापणी करण्यास त्रासदायक व खर्चिक होणार आहे.
यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. याचा सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून ओळा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
निसर्गाचा लहरीपणा, महागडी खते, बी-बियाणे, औषधे, वाढती मजुरी, रोगांचा प्रादुर्भाव आदी संकटांवर मात करून अपार मेहनतीत शेतकरी आपली शेती करत असतो. त्याच्या कष्टाने तयार झालेले भातपीक हातातून निसटून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसत आहे.

-----------------
शेती व्यवसायात मजुरांचा तुटवडा ही मुख्य समस्या असून हा व्यवसाय सरकारने रोजगार हमी योजनेंतर्गत आणायलाच हवा. तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक योग्य मार्गदर्शनासाठी तालुका स्तरावर शासकीय कृषी तज्ज्ञांच्या संख्येत अधिक वाढ करून अधिकाधिक कृषी शिबिरे आयोजित करावीत. जेणेकरून शेतकऱ्यांचे योग्य प्रबोधन होईल.
- श्रीकांत भोईर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वाडा