दोन दिवसांत शहरातील सर्व कमानी उतरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसांत शहरातील सर्व कमानी उतरणार
दोन दिवसांत शहरातील सर्व कमानी उतरणार

दोन दिवसांत शहरातील सर्व कमानी उतरणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : पालिका प्रशासनाकडून जाहिरात, बॅनरवर कारवाई होत असताना शहरातील कमानींची टांगती तलवार मात्र कायम होती. सण-उत्सव पार पडून पाच सहा दिवस उलटले तरी कमानींवर कारवाई होत नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने बुधवारी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत दोन दिवसांत शहरातील सर्व कमानी उतरवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी उपायुक्तांना दिले आहेत.

राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, त्यानंतर दसरा यांच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय पक्षांकडून शक्‍तिप्रदर्शन करण्यासाठी बॅनर, मोठमोठ्या कमानी लावण्यात आल्या होत्या. दसरा होऊन पाच सहा दिवस उलटले तरी रस्त्यावरील कमानी काढण्यात आल्या नाहीत. पालिका प्रशासनाकडून बॅनर, फलकांवर कारवाई केली जात असली तरी बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचे बॅनर, कमानींना ते अद्याप हात लावू शकलेले नाहीत. या कमानी वाहतुकीस अडथळा निर्माण तर करत आहेत, परंतु शहर विद्रुपीकरणास कारणीभूत ठरत आहेत. या बड्या कमानींना परवानगी असावी, अशी सबब पालिका अधिकारी देत आहेत. याविषयी ‘सकाळ’ने बुधवारी ‘कमानींची टांगती तलवार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते.

सण-उत्सवानंतर या कमानी कशाला, कमानी पडून अपघात घडूनही प्रशासन त्याकडे कानाडोळा करत आहे. याविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वाहनचालकांना होणार त्रास, शहरात होणारी वाहतूककोंडी या समस्यांना या वृत्तातून वाचा फोडण्यात आली होती.

या वृत्ताची गंभीर दखल पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतली आहे. बुधवारी सकाळीच पालिकेतील उपायुक्त, अधिकाऱ्यांना सर्व कमानी उतरवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच, सण-उत्सव संपल्यानंतर कोणत्याही कमानीला परवानगी देण्‍यात आलेली नसून, सर्व कमानी दोन दिवसांत उतरल्या पाहिजेत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे. यामुळे आता शहरातील बड्या राजकीय नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या कमानी उतरतात का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
----------------------------------
कोट
कमानींना परवानगी प्रभाग समिती स्तरावर दिली जाते. ज्यांना परवानगी दिली होती ती देखील सणासुदीच्या कालावधीपुरती दिली होती. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कमानी ठेवण्याचे काहीच कारण नाही. उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दोन दिवसांत शहरातील सर्व कमानी काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, केडीएमसी