शहापुरात वीटभट्टीसह भाजीपाल्‍याचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात वीटभट्टीसह भाजीपाल्‍याचे नुकसान
शहापुरात वीटभट्टीसह भाजीपाल्‍याचे नुकसान

शहापुरात वीटभट्टीसह भाजीपाल्‍याचे नुकसान

sakal_logo
By

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी व वीटभट्टी मालकांवर अस्मानी संकट कोसळले आहे. वीटभट्टीचा हंगाम सुरू झाल्याने अनेक उद्योजकांनी वीटभट्ट्या नव्याने लावल्या होत्या; परंतु पावसामुळे विटांचे पाणी झाले. तसेच भाजीपालाही कुजल्‍याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून मेहनतही वाया गेली आहे.
लॉकडाऊनमुळे बंद असलेला वीटभट्टीचा व्यवसाय यंदा नव्‍यानेच सुरू झाला होता. त्यात पावसामुळे अस्मानी संकट कोसळल्‍याने शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना आता मदतीची गरज आहे.
तालुक्यातील अजनुप, वेलुक, वाशाळा, बेलवड, साजीवली, किन्हवली, डोळखांब, वासिंद, खर्डी या परिसरातील भाजीपाल्यावर अवकाळी पावसामुळे रोग पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विटांच्या भट्ट्या रचण्‍यास सुरुवात होत असतानाच विटाच्या मातीचे पाणी झाल्याने मजुरांची सर्व मेहनत वाया गेली.
सध्‍याच्‍या परिस्थितीत विटांचे उत्पादन आणि कमी झालेली मागणी यामुळे विटांचे वाढलेले दर यावर्षी एकदम खाली आल्याने वीटभट्टीचा व्यवसाय अडचणीत आला होता. त्यात या अवकाळी पावसामुळे विटांचे पाणी झाल्याने वीटभट्टी मालकांवर उपासमारीची पाळी आली असल्याचे वीटभट्टीचे मालक अशोक वेखंडे यांनी सांगितले.
---------------------------------------------------------------
पावसामुळे शेतकऱ्यांचे, भाजीपाला लागवड व वीटभट्टी मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.
-नीलेश भांडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहापूर.