महामार्ग प्राधिकरण कार्यालय पुन्हा घोडबंदरमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग प्राधिकरण कार्यालय पुन्हा घोडबंदरमध्ये
महामार्ग प्राधिकरण कार्यालय पुन्हा घोडबंदरमध्ये

महामार्ग प्राधिकरण कार्यालय पुन्हा घोडबंदरमध्ये

sakal_logo
By

पालघर, ता. १२ (बातमीदार) : अखेर अनेक प्रयत्नांनंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय घोडबंदर येथे स्थलांतरित झाले आहे. यापूर्वी हे कार्यालय गुजरातमध्ये स्थलांतरित केले होते. आता पुन्हा घोडबंदर परिसरात पूर्वी कार्यालय असलेल्या ठिकाणी हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे महामार्गावर असलेल्या विविध समस्यांचा लवकरच निपटारा होणार आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा अपघातांच्या मालिकेमुळे सतत चर्चेत आहे. अलीकडेच प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरला होता. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय गुजरातमधील भरूच येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे या महामार्गावर अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याचे आरोप अनेक वेळा झाले. लोकप्रतिनिधींनीही अनेक वेळा महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय महाराष्ट्रात स्थलांतर करण्यासाठी प्रशासनासह महामार्ग प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर सर्वांचे प्रयत्न फळाला आले असून काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये घोडबंदर येथे जुने कार्यालय असलेल्या ठिकाणी हे कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे.
महामार्ग देखभाल-दुरुस्तीचे काम करणाऱ्या बेजबाबदार ठेकेदाराविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुन्हे दाखल केले होते. अशा बेजबाबदार वागणाऱ्या महामार्ग यंत्रणेतील सर्वांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार राजेंद्र गावित यांनीही केली होती. तसेच महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय महाराष्ट्रात यावे यासाठी यापूर्वी त्यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केले आहेत. अखेर या प्रयत्नांना यश आले असून हे कार्यालय ठाणे घोडबंदर परिसरात कार्यान्वित केल्यामुळे आता या महामार्गावर प्राधिकरण कार्यालय व्यवस्थित लक्ष ठेवून राहील, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

प्रकल्प संचालकांचे पद मंजूर
घोडबंदर येथे हे कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प संचालकांचे पद मंजूर करण्यात आले आहे. यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहणारे निवृत्त अधिकारी व आताचे मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेचे एक अधिकारी या कार्यालयाचे कामकाज पाहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हे अधिकारी लक्ष ठेवून असतील. तसेच या अधिकाऱ्यांना या महामार्गाची पुरेपूर जाण व माहिती असल्यामुळे ते महामार्गावरील समस्यांचा लवकर निपटारा करतील, अशी आशा महामार्गावरील सुरक्षेसाठी काम करणाऱ्या संघटनांनी व त्यातील प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

पाठपुराव्याला यश
महामार्गावर होत असलेले अपघात लक्षात घेता रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून कार्यालयाचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात आला होता. तसेच महामार्गावरील समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय महाराष्ट्रात आणावे, अशी प्रकर्षाने मागणी केल्यानंतर हे कार्यालय अखेर घोडबंदर येथे स्थलांतर करून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयाला अधिकारी वर्गही देण्यात आला आहे. त्यामुळे आता महामार्गावरील समस्या सोडवण्यासाठी व महामार्गाशी निगडित तक्रारींच्या समन्वयासाठी हे कार्यालय सोयीचे जाईल, असे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.