‘मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार’
‘मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार’

‘मशाल चिन्हावरच निवडणूक लढवणार’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : ऋतुजा लटके हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबतचे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते; मात्र लटके यांनी आज पालिका मुख्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले, की त्या निवडणूक मशाल चिन्हावरच लढणार आहेत.
‘मला पाहून वाटते का की माझ्यावर दबाव आहे’ असा प्रतिप्रश्नच त्यांनी माध्यमांना केला. माझ्यावर कोणताही दबाव नाही. तसेच मला कोणतीही ऑफर नाही असेही त्यांनी सांगितले. ‘माझे पती रमेश लटके हेदेखील नेहमीच उद्धव साहेबांसोबत राहिले. आमची लटके कुटुंबीयांची जी निष्ठा आहे, ती उद्धव साहेबांसोबतच आहे’ असेही लटके यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ‘मी मुंबई महापालिकेकडे राजीनामा मंजूर व्हावा म्हणून सामान्य प्रशासनाकडे गेल्या तीन दिवसांपासून फेऱ्या मारत आहे. जीएडी विभागाने माझे महिन्याचे वेतन देण्यासाठी चलनही भरून घेतले आहे. तसेच पालिकेने माझा राजीनामा आजच मंजूर करावा, अशीही विनंती मी आयुक्तांकडे केली आहे. जीएडी विभागाची सर्व तयारी झालेली असतानाच फक्त राजीनाम्यावर सही बाकी आहे, असे कारण दिले आहे. याआधीच राजीनाम्याची सूचना दिली होती, पण दुसऱ्यांदा दिलेले पत्र हे राजीनाम्याचे होते, असेही लटके यांनी स्पष्ट केले आहे. या राजीनामा मंजुरीत काही तांत्रिक अडचणी आहेत असे मला वाटत नाही. मी दिलेला राजीनामा हा तातडीने मंजूर व्हावा, अशी विनंती मी पालिकेकडे केली आहे.’