बोगस शपथ पत्राची चौकशी करावी : नरेश म्हस्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस शपथ पत्राची चौकशी करावी : नरेश म्हस्के
बोगस शपथ पत्राची चौकशी करावी : नरेश म्हस्के

बोगस शपथ पत्राची चौकशी करावी : नरेश म्हस्के

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १२ : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून शिवसेना कोणाची हा वाद अद्याप संपलेला नाही. अशातच मुंबईतील निर्मलनगर परिसरात आढळून आलेल्या बोगस शपथपत्रप्रकरणी सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली. बुधवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच या वेळी त्यांनी महाप्रबोधिनी यात्रेवरून दाखल झालेल्या पोलिस ठाण्यातील तक्रारीप्रकरणीदेखील त्यांनी जैसी करणी वैसी भरणी अशी प्रतिक्रिया दिली.
शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे व शिंदे असे दोन गट पडले. या दोन्ही गटांत शिवसेना कोणाची यावरून राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली शपथपत्रे बोगस असल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला. तसेच निर्मल नगर येथे जी शपथपत्रे आढळून आली आहेत, त्यातील ९९.९९ टक्के लोकांनी सांगितले, की ही शपथपत्रे आमची नाहीत. ज्या नोटरीने ही शपथपत्रे तयार केली आहेत तो आता गायब झाला आहे. त्याला आधी पकडून त्याची सखोल चौकशी करा. अशी बोगस शपथपत्रे तयार करण्यासाठी त्या नोटरीला १० कोटी रुपये दिले असल्याचा आरोपदेखील या वेळी म्हस्के यांनी केला. तसेच निवडणूक आयोगानेदेखील ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रांची खातरजमा करावी, अशी मागणीही त्यांनी केली; तर लटकेप्रकरणी त्यांना प्रश्न विचारला असता ‘आगे, आगे देखो होता है क्या’ असं उत्तर म्हस्के यांनी दिले.

जैसी करणी, वैसी भरणी
............................
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तेव्हा मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे तेव्हा त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून जेलमध्ये टाकत गुन्हा दाखल केला, तेव्हा तुमचे व्यक्तिस्वातंत्र्य कुठे होते? कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती ज्या महिला आहेत त्यांची टिंगलटवाळी केली गेली. त्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जैसी करणी वैसी भरणी असे सांगत नारायण राणे यांच्या वेळी तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्य विसरला होतात; मात्र कालच्या सभेत त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने आरोप, टिंगलटवाळी नेत्यांनी केली. त्यामुळे गुन्हे दाखल केलेले असल्याचे स्पष्ट मत नरेश म्हस्के यांनी या वेळी व्यक्त केले.