मोरा बंदर गेला गाळात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरा बंदर गेला गाळात
मोरा बंदर गेला गाळात

मोरा बंदर गेला गाळात

sakal_logo
By

उरण, ता. १२ (वार्ताहर) : मोरा ते मुंबई जलप्रवास विना अडथळा सुरू राहावा, यासाठी चार महिन्यांपूर्वी मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी चार कोटी खर्च आला होता. मात्र, बंदरात गाळाची समस्या कायम राहिल्याने चार दिवसांपासून ठराविक कालावधीसाठी उरण-भाऊचा धक्का प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आली आहे. कोट्यवधींच्या खर्चानंतरही गाळाची समस्या कायम राहिल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे बंदरातील गाळ नक्की काढला जातो का? याबाबत नागरीकांमध्ये शंका उपस्थित होत आहे.
मोरा बंदरातून भाऊचा धक्का येथून मुंबईत पोहोचण्यासाठी अवघा एक तास लागतो. प्रदूषण, वाहतूक कोंडी आदी त्रासापासून दूर ठेवणारा अत्यंत जवळचा आणि फक्त ८० रुपयांत मुंबईत पोहचवणारा स्वस्त अशी मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गाची ओळख आहे. मात्र, गाळामुळे ओहोटीच्या वेळी वाहतूक बंद होण्याची सर्वांत मोठी समस्या बंदरात आहे. बंदरात सातत्याने गाळ साचत असल्याने समुद्राच्या ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी मोरा बंदरातील गाळात रुतून बसतात. त्यामुळे प्रवासी बोटी बंदरापर्यंत पोहचू शकत नाहीत. कधी कधी तर चिखलातून चालत जेटीवर येण्याची नामुष्की प्रवाशांवर येते. त्यावर पर्याय म्हणून ओहोटीच्या वेळी प्रवासी बोटी ठराविक कालावधीसाठी बंद ठेवण्यात येत आहे.

समस्या कायम
दररोज कामासाठी मुंबईत जाणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते. गाळामुळे सातत्याने विस्कळित होत असलेली उरण-भाऊचा धक्का प्रवासी लाँच सेवा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र बंदर विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून मोरा बंदरातील गाळ काढण्यात आला. मात्र, त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरण्याचे थांबलेले नाही.

दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी या वर्षीही मे-जून महिन्यात चार कोटी खर्चून एक लाख १८ हजार ९२७ क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला होता. मात्र, चार महिन्यांपूर्वी गाळ काढल्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरलेलेच आहे. मोरा बंदरात साचलेल्या गाळामुळे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान सलग चार दिवस प्रवासी वाहतूक ठराविक कालावधीसाठी बंद ठेवली होती.
- प्रकाश कांदळकर, विभाग अधिकारी, मोरा बंदर