कचऱ्याविरोधात जनआंदोलनाची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्याविरोधात जनआंदोलनाची हाक
कचऱ्याविरोधात जनआंदोलनाची हाक

कचऱ्याविरोधात जनआंदोलनाची हाक

sakal_logo
By

कामोठे, ता. १३ (बातमीदार) : पनवेल महापालिका गोळा केलेला कचरा नवीन पनवेलच्या सेक्टर एकमधील निवासी क्षेत्रात आणून टाकत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने कचरा टाकणे बंद करावे, अन्यथा याविरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या विरोधामुळे तक्का गाव येथे कचरा टाकण्यास बंद केल्यावर महापालिकेने नवीन पनवेल सेक्टर एक येथे कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. या विभागात नागरी वस्तीसह, रुग्णालय, मंगल कार्यालय, गतिमंद मुलांची शाळा, धार्मिक स्थळे आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. नागरिकांनी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या भेटीदरम्यान कचरा इतरत्र टाकण्यासाठी महापालिकेला भाग पाडावे, अशी मागणी केली होती. प्रीतम म्हात्रे यांनी नागरिकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सेक्टर एकमधील जागेची पाहणी केली. त्यानंतर महापालिका सहाय्यक आयुक्त वैभव विधाते यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तसेच सेक्टर एकमध्ये कचरा टाकणे बंद करावे, अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी आदईचे सरपंच परशुराम गरुडे, प्रभाकर कांबळे, शरद घुले, ज्येष्ठ शिवसैनिक किरण सोनावणे आणि नागरिक उपस्थित होते.