तळागाळातील नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळागाळातील नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचवा
तळागाळातील नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचवा

तळागाळातील नागरिकांपर्यत आरोग्यसेवा पोहचवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १३ : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, तसेच विविध आरोग्य केंद्रांत उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्णसेवा केंद्रस्थानी ठेवून रुग्णांशी सहानुभूतीने संवाद साधा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या व महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सेवा द्या, तसेच महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेले राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचतील अशा दृष्टीने काम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या.
बुधवारी (ता. १२) सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशांनुसार अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश शर्मा, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम हे सर्वंच महापालिकांमध्ये राबविले जात आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या आरोग्य सुविधा या जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांनी नागरिकांपर्यंत पोहचून राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची माहिती त्यांना देणे आवश्यक आहे. तसेच किती गृहभेटी दिल्या, त्याचा दैनंदिन तपशील वरिष्ठांना देणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अतिरिक्त आयुक्तांनी या बैठकीत दिला. जे कर्मचारी कामात दिरंगाई किंवा टाळाटाळ करीत असतील अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.