वीज टॉवरबद्दल शेतकऱ्यांना जादा मोबदला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज टॉवरबद्दल शेतकऱ्यांना जादा मोबदला
वीज टॉवरबद्दल शेतकऱ्यांना जादा मोबदला

वीज टॉवरबद्दल शेतकऱ्यांना जादा मोबदला

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण तालुक्यात विद्युत टॉवर व वाहिन्यांमुळे बाधित जमीनमालक व शेतकऱ्यांना आता बाजारभावाच्या सरासरीने जादा मोबदला मिळणार आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प मोबदल्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. त्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेडतर्फे कल्याण तालुक्यात उच्च दाबाचे टॉवर व विद्युत वाहिनी टाकण्यासाठी जमीनमालक व शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र समृद्धी महामार्ग, मुंबई-वडोदरा प्रकल्प आणि कल्याण-कसारा प्रकल्पांतर्गत देण्यात आलेल्या नुकसानभरपाईपेक्षा शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जात होता. त्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नुकसानभरपाईतील तफावतीबद्दल सविस्तर निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट घेऊन दिले होते. तसेच या प्रश्नावर तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती केली होती.

………….
सरासरीच्या दुप्पट मोबदला
या प्रकरणी राज्य सरकारने बुधवारी (ता. १२) वीज मनोरे आणि पारेषण वाहिन्यांच्या जागेसाठी सुधारित धोरण राबविण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना भरघोस मोबदला देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार त्या परिसरातील गेल्या तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहाराच्या दराचा सरासरी दर ग्राह्य धरून त्या सरासरी दराच्या दुप्पट मोबदला आता शेतकरी व जमीन मालकाला मिळणार आहे.

…………
संपूर्ण राज्यात अंमलबजावणी
विद्युत तारेखालील जमिनीसाठी एकूण ३० टक्के मोबदला दिला जाईल. या निर्णयाची कल्याण तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नातून राज्यभरातील शेतकऱ्यांना लाभ मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांकडून आभार मानण्यात येत आहेत.