निवडणूक अधिकाऱ्या विरोधात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक अधिकाऱ्या विरोधात तक्रार
निवडणूक अधिकाऱ्या विरोधात तक्रार

निवडणूक अधिकाऱ्या विरोधात तक्रार

sakal_logo
By

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराच्या पत्नीच्या नावे मालमत्ता थकबाकी असल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज अवैध ठरविला आहे. सदर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष परेश पाटील यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रुप ग्रामपंचायत शिरोळे येथील प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार अनंत भागोजी गोंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी थकबाकी नसल्याचा दाखला दिला होता; परंतु छाननीच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्या दाखल्यावर हरकत घेत अनंत गोंड यांच्या पत्नीच्या
नावे थकबाकी असल्याबाबत छाननी प्रक्रियेत हरकत नोंदविली होती. ती हरकत विचारात घेत अधिकाऱ्याने थकबाकी नसल्याबाबतचा दिलेला दाखला अमान्य करून उमेदवारी अर्ज अवैध ठरविला.
या कारवाईस अनंत गोंड यांनी हरकत घेत तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून लेखी पुरावा न घेता आपला उमेदवारी अर्ज बाद करणे व निवडणूक प्रक्रिया संहितेची पूर्णतः पायमल्ली केली आहे. आक्षेप घेणाऱ्या प्रतिपक्षाने खोटे दस्तावेज सादर करून शासकीय कागदपत्रांवर बेकायदेशीरपणे खाडाखोड केली आहे. बोगस घर दाखवून आदिवासी उमेदवाराची फसवणूक केल्याचा आरोप परेश चौधरी यांनी लेखी निवेदनात केला आहे. तहसीलदार अधिक पाटील यांच्या अनुपस्थित नायब तहसीलदार गोरख फडतरे यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले आहे.

………….
निवडणूक प्रक्रियेपासून दूर करावे
निवडणूक निर्णय अधिकारी पी. बी. दमाणे यांना तहसीलदारांनी शिरोळे ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेपासून दूर करावे. तसेच जाणीवपूर्वक अनुसूचित जमाती उमेदवाराचा हक्क हिरावून घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने उमेदवार बाद केल्याबाबत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.